राष्ट्रीय

रणवीर अलाहाबादियाला न्यायालयाकडून दिलासा; पॉडकास्ट शो पुन्हा सुरू करण्यास सशर्त अनुमती, अटकेलाही दिली स्थगिती

‘इंडिया गॉट लेटंट’ कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केल्याने अडचणीत आलेला यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : ‘इंडिया गॉट लेटंट’ कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केल्याने अडचणीत आलेला यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला सोशल मीडियावर पॉडकास्ट शो पुन्हा सुरू करावयास सशर्त परवानगी दिली आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत त्याच्या अटकेलाही स्थगिती दिली आहे.

अलाहाबादियाने म्हटले आहे की, त्याच्या ‘शो’साठी २८० कर्मचारी काम करतात. शो बंद झाल्यास त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण होईल. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, मूलभूत अधिकार हे अनिर्बंध नाहीत, त्यावर काही मर्यादा आहेत. सध्या याचिकाकर्त्याच्या ‘शो’वर बंदी घातलेली आहे. पॉडकास्ट सादर करताना नैतिकता, सभ्यता आणि शालीनतेचे पालन व्हावे, जेणेकरून कोणत्याही वयोगटातील प्रेक्षक हा ‘शो’ पाहू शकतील, असे हमीपत्र याचिकाकर्ता देत असेल तर त्यांना शो पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी देता येईल.

अश्लील नाही तर विकृत - महाधिवक्ता

केंद्र सरकारच्यावतीने महाधिवक्ता तुषार मेहता म्हणाले की, कुतूहलापोटी मी रणवीर अलाहाबादिया जे बोलला तो व्हिडीओ पाहिला. मला वाटते, त्याचे बोलणे अश्लीलच नाही तर विकृत होते. विनोद वेगळा आणि अश्लिलता वेगळी, तर विकृती त्यापुढची पातळी आहे. त्यामुळे रणवीर अलाहाबादियाला काही काळ बोलू न देणे उत्तम राहील.

समर रैनाच्या यूट्यूब शोवर अलाहाबादियाने आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याचे पॉडकास्ट प्रसारित करणे बंद करण्यास सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाने आता रणवीरला दिलासा दिला असला तरी त्याला कार्यक्रमात आक्षेपार्ह काही प्रसारित होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.

रणवीर अलाहाबादियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पॉडकास्ट हे माझ्या उदरनिर्वाहाचा एकमेव स्रोत आहे ते पुन्हा प्रसारित करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी रणवीरने केली होती. रणवीरने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोवर आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे अलाहाबादियाविरोधात अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सायबर सेल आणि मुंबई पोलीस रणवीरच्या विधानाची चौकशी करत आहेत.

एका अधिकाऱ्याने सोमवारी माहिती देताना सांगितले की, रणवीर अलाहाबादिया आणि यूट्यूबर आशीष चंचलानी हे दोघेही पोलिसांसमोर जबाब नोंदवण्यासाठी स्वतंत्रपणे हजर राहिले होते. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. अलाहाबादियाने आक्षेपार्ह विधान करून आपण चूक केल्याचे कबूल केल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत