दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात  प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणात सुरुवातीला कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. आरोपींची ओळखही स्पष्ट नव्हती. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेराही नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते.

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : दिल्लीतील स्वरूप नगर परिसरात १७ वर्षीय मुलीवर कथित सामूहिक अत्याचार करून चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १३ सप्टेंबर रोजी कुशक रोडवरील मोकळ्या मैदानात मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था इतकी कुजलेली होती की सुरुवातीला तो पुरुषाचा आहे की महिलेचा, हेही स्पष्ट होत नव्हते. या प्रकरणाचा तपास करताना दिल्ली पोलिसांनी ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संशयित टेम्पोचा माग काढला आणि चौघांना ताब्यात घेतले. घटनेचा नेमका घटनाक्रम आणि प्रत्येक संशयिताची भूमिका निश्चित करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

कुशक रोडवरील मोकळ्या मैदानात मृतदेह

१३ सप्टेंबरच्या सकाळी उत्तर-पश्चिम दिल्लीतील स्वरूप नगर परिसरातील कुशक रोडवरील लाल बॉर्डरजवळ जयपाल राणा यांच्या शेताजवळ मोकळ्या मैदानात मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक, क्राइम टीम आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झाल्याने त्याची ओळख पटवणे कठीण होते. मृतदेहाचे काही भाग भटक्या कुत्र्यांनी खाल्ल्याचेही पोलिसांनी सांगितले. तसेच एक हात शरीरापासून वेगळा झालेल्या अवस्थेत आढळल्याचे वृत्त आहे.

मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दाखल केली नव्हती. ती यापूर्वीही कधीकधी घराबाहेर जाऊन काही दिवसांनी परत येत असे, अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले.

टेम्पोत नेऊन अत्याचार केल्याचा आरोप

पोलिसांच्या तपासानुसार, पीडित मुलगी आरोपींच्या परिचयाची होती. ती एका मित्राला भेटण्यासाठी बाहेर पडली होती. त्यानंतर ती आरोपींसोबत टेम्पोत गेली. टेम्पोमध्ये सर्वांनी कथितरीत्या मद्यपान केले. त्यानंतर मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लैंगिक अत्याचारानंतर मुलीची चाकूने हत्या करण्यात आली आणि तिचा मृतदेह मोकळ्या मैदानात टाकून देण्यात आला. तिच्या शरीरावर चाकूच्या अनेक जखमा आढळल्याचे वृत्त आहे. मात्र, घटनेचा नेमका क्रम आणि प्रत्येक आरोपीची भूमिका निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून तपासाची दिशा

या प्रकरणात सुरुवातीला कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. तसेच आरोपींची ओळखही स्पष्ट नव्हती. घटनास्थळी थेट सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. त्यानंतर परिसरातील तसेच घटनास्थळाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गांवरील ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.

फुटेज तपासत असताना संबंधित वेळेत घटनास्थळाजवळ एक संशयित टेम्पो फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आला. मात्र, अंधारामुळे टेम्पोचा नंबर स्पष्ट दिसत नव्हता. टेम्पोच्या डाव्या बाजूला असलेल्या एका विशिष्ट चिन्हावरून पोलिसांनी त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याच्या हालचाली तपासून पोलिसांनी टेम्पोचा मार्ग निश्चित केला.

रात्रभर शोधमोहीम, अखेर टेम्पो सापडला

१५ आणि १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवली. अखेर संशयित टेम्पो स्वरूप नगर परिसरातील खड्डा कॉलनीत आढळून आला. टेम्पोच्या चालकाची चौकशी केल्यानंतर तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला.

चालकाने दिलेल्या माहितीनुसार, १० आणि ११ सप्टेंबरच्या रात्री चार मुलांनी त्याचा टेम्पो घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी या माहितीच्या आधारे संशयितांपर्यंत पोहोचत चौघांना ताब्यात घेतले. त्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा ७२ तासांच्या आत लावल्याचा दावा केला आहे.

चौघे ताब्यात

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रौढ आरोपीची ओळख शिवम उर्फ सुदामा उर्फ चुचू, रा. खड्डा कॉलनी, स्वरूप नगर अशी करण्यात आली आहे. अन्य तीन आरोपी अल्पवयीन असून त्यांचे वय १६ आणि १७ वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणात कथितरीत्या वापरण्यात आलेले दोन चाकू, आरोपींनी घटनेच्या वेळी परिधान केलेले कपडे आणि टेम्पो (DL-1LAG-0257) पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेले साहित्य फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी स्वरूप नगर पोलिस ठाण्यात FIR क्रमांक ३८०/२०२६ नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच पॉक्सो कायद्यातील कलम ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून क्राइम टीम आणि एफएसएल पथकाने आवश्यक पुरावे गोळा केले आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका, घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि आणखी कोणी या गुन्ह्यात सहभागी होते का, याची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक अहवाल आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२

एकच शेतजमीन अनेकांना विकली; ३५ जणांना ११.८५ कोटींचा गंडा, नांदेडमध्ये तिघांना अटक

कोणाकडून तेल घ्यावे हे तिसरा देश ठरवू शकत नाही; चीनने ठणकावले, अमेरिकेच्या निर्बंध विधेयकाला विरोध