नवी दिल्ली : हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता राजधानी नवी दिल्लीतही भाजपचे कमळ फुलणार, असा अंदाज बुधवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर बहुतांश ‘एक्झिट पोल’नी नोंदवला आहे. नवी दिल्लीत विधानसभेच्या ७० जागांवर बुधवारी मतदान पार पडले. मात्र, यंदा नवी दिल्लीकरांचा कल ‘आप’ऐवजी ‘भाजप’कडे असल्याचे ‘एक्झिट पोल्स’नी म्हटले आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांची हॅटट्रिक हुकणार असून तब्बल २५ वर्षांनंतर नवी दिल्लीत कमळ फुलणार, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
केजरीवाल यांच्या ‘आप’ने गेली दोन टर्म नवी दिल्लीत सत्ता राखली होती. अनेक चांगले निर्णय घेतल्यामुळे यंदा पुन्हा एकदा राजधानीच्या सत्तेच्या चाव्या केजरीवालच राखणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, देशाच्या अनेक राज्यात विजयश्री खेचून आणणाऱ्या भाजपने यंदा ‘आप’ला कडवी टक्कर दिली. त्यामुळे स्वबळावर लढणारा काँग्रेस या निवडणुकीत कुठेच दिसला नाही. ‘आप’ आणि ‘भाजप’ यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे निवडणुकीची चुरस आणखीनच वाढली होती. आता दिल्लीकरांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याचे बहुतेक ‘एक्झिट पोल’च्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
निवडणुकीचे अंदाज वर्तवणाऱ्या ‘चाणक्य स्ट्रॅटेजी’ने भाजपला ३९-४४ तर आपला २५-२८ जागा मिळतील, असे म्हटले आहे. काँग्रेस २-३ जागांवरच राहील, असेही त्यांचे म्हणणे आहे. २०२०च्या निवडणुकीत अवघ्या ८ जागा पटकावणारा भाजप आता ४२-५० जागांवर मुसंडी मारेल, असा अंदाज ‘पोल डायरी’ने वर्तवला आहे. त्यांनी आपला १८-२५ जागा मिळतील, असे म्हटले आहे. एबीपी मॅट्रिझच्या मते, भाजप ३५-४० जागांवर पोहोचेल तर आप ३२-३७ जागांवरच राहील. पी मार्कच्या अंदाजानुसार, भाजपला ३९-४४ तर आपला २१-३१ जागा मिळतील. पीपल पल्सच्या शक्यतेनुसार, भाजप ५१-६० जागांसह दणदणीत विजय मिळवेल तर आपची सत्ता १०-१८ जागांसह उलथवण्यात येईल. पीपल्स इनसाइटच्या मते, भाजप ४०-४४ जागांसह दिल्लीत सत्ता स्थापन करेल तर आपला २५-२८ जागा मिळतील. जेव्हीसीच्या मते, भाजप ३९-४५ जागांसह दिल्लीत सत्तेवर येईल आणि आपची २२-३२ जागांसह पिछेहाट होईल. फक्त ‘वीप्रिसाईड’ने ‘आप’चे सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येईल, असे म्हटले आहे. त्यांच्या मते, आपला ४६-५२ जागा मिळतील आणि भाजपला १८-२३ जागांवर समाधान मानावे लागेल.
दिल्लीत ५ वाजेपर्यंत ५७.८५ टक्के मतदान
नवी दिल्लीत बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. ७० जागांसाठी ६९९ उमेदवार रिंगणात असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५७.८५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. ईशान्य दिल्लीत सर्वाधिक ६३.८३ टक्के मतदान झाले तर सर्वात कमी ५३.७७ टक्के मतदान हे आग्नेय दिल्लीत झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, विद्यमान मुख्यमंत्री आतिशी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी आई सोनिया, पती रॉबर्ड वाड्रा आणि मुलासह मतदान केले. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पालकांना व्हीलचेअरवर घेऊन मतदान केले.
सट्टेबाजाराचा कौल ‘आप’च्या बाजूने
सर्व एक्झिट पोल्सनी भाजपच्या बाजूने कौल दिला असला तरी सट्टेबाजाराचा अंदाज नवी दिल्लीत पुन्हा एकदा ‘आप’चे सरकार सत्तेवर येईल, असा आहे. सट्टेबाजाराच्या अंदाजानुसार, गेल्या वेळच्या तुलनेत ‘आप’च्या जागा कमी होऊ शकतात, परंतु केजरीवाल हेच सरकार स्थापन करतील. राजस्थानच्या फलोदी सट्टाबाजारने ‘आप’ला ३८-४० जागा, भाजपला ३०-३२ जागा आणि काँग्रेसला ०-१ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.