अरविंद केजरीवाल संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

‘आप’च्या उमेदवारांना लाच देण्याचा भाजपचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या आरोपानंतर ‘एसीबी’ची नोटीस

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालापूर्वी भाजपने आम आदमी पार्टीच्या (आप) उमेदवारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक निकालापूर्वी भाजपने आम आदमी पार्टीच्या (आप) उमेदवारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला. या आरोपानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या आदेशावरून दिल्ली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) याबाबतचा सविस्तर तपशील आणि पुरावे सादर करावे यासाठी केजरीवाल यांच्यावर शुक्रवारी कायदेशीर नोटीस बजावली. केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही नोटीस पाठविण्यात आल्याने विधानसभा निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येवर ‘आप’ आणि भाजपमधील तणाव वाढला आहे. ही राजकीय चाल असल्याचे ‘आप’ने म्हटले आहे. भाजपमध्ये येण्यासाठी आपच्या १६ उमेदवारांना लाच देण्याचे आमिष दाखविण्यात आले, असा आरोप केजरीवाल यांनी ‘एक्स’वर केला होता. त्यासंदर्भात प्रामुख्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे.

१६ उमेदवारांची नावे द्या!

‘एक्स’वर टाकण्यात आलेली पोस्ट आपलीच आहे का, याची खातरजमा करून त्याबाबतचे पुरावे व सविस्तर तपशील देण्याची मागणीही केजरीवाल यांच्याकडे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्या १६ उमेदवारांना दूरध्वनी आले त्यांची नावे, त्यांच्याशी कोणी संपर्क साधला, त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि आरोपांच्या पुष्ट्यर्थ पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या आदेशानंतर ‘एसीबी’ची टीम आप नेते अरविंद केजरीवाल, संजय सिंह आणि मुकेश अहलावत यांच्या घरी पाठवण्यात आली. ‘एसीबी’ची टीम घरी पोहोचताच ‘आप’च्या कायदेशीर टीमचे काही वकीलही केजरीवालांच्या घरी पोहोचले. केजरीवाल एसीबीच्या पथकाला भेटलेच नाहीत, त्यामुळे दीड तासानंतर एसीबीचे पथक त्यांच्या घराबाहेर पडले. पण, पथकाने केजरीवालांच्या कायदेशीर टीमला नोटीस दिली आणि त्यांचे म्हणणे नोंदवण्यास सांगितले. दरम्यान, आप खासदार संजय सिंह यांनी १५ कोटींच्या ऑफरबाबत ‘एसीबी’ कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे एसीबीच्या कार्यालयात आप खासदार संजय सिंह यांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो.

त्यापूर्वी एसीबीचे पथक केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्याकडे कायदेशीर नोटीस नसल्याने ते निवासस्थानाबाहेरच बसून होते. जवळपास दीड तासानंतर त्यांनी नोटीस बजावली. भाजपशी संगनमत करून नायब राज्यपालांच्या कार्यालयाने हे नाटक रचले कारण अधिकारी दबावाखाली होते, असे ‘आप’चे संजीव नसियार म्हणाले.

मानसिक दबावासाठी 'ऑपरेशन लोटस'चा वापर

‘ऑपरेशन लोटस’ची अंमलबजावणी करण्यासाठी भाजप मतदानोत्तर चाचण्यांचा वापर करून मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असला तरी सलग चौथ्यांदा दिल्लीत ‘आप’चेच सरकार स्थापन होणार असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. केजरीवाल यांनी पक्षाच्या सर्व उमेदवारांची शुक्रवारी बैठक बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उमेदवारांनी आपला अहवाल सादर केला. त्यानुसार पक्षाला ५० हून अधिक जागा मिळणार असल्याचे सूचित होत आहे. तथापि, सात-आठ जागांवर कांटे की टक्कर होणार असल्याचे बोलले जात आहे.

दिल्लीत आज मतमोजणी

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी होणार असून ‘आप’ सलग चौथ्यांदा सत्तेवर येणार की २७ वर्षांनंतर भाजप बाजी मारणार, याचा फैसला होणार आहे. गेल्या दोन निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसलाही काही जागा मिळण्याची आशा आहे. मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपच्या पारड्यात झुकते माप टाकले आहे. भाजपने जवळपास ५० जागांवर विजयी होण्याचा दावा केला आहे, तर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष ‘आप’ने फेटाळले आहेत.

नायब राज्यपालांचे चौकशीचे आदेश

भाजपकडून आमदारांना लाच देण्याचे आमिष दाखविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर भाजपचे विष्णू मित्तल यांनी आप खोटी माहिती पसरवत असल्याबद्दल सक्सेना यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर सक्सेना यांनी ‘एसीबी’ला चौकशीचे आदेश दिले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री