महिलेचे फोटो काढले, जाब विचारला तर पिस्तूल रोखली; दिल्ली मेट्रोत गोंधळ, CISF जवान निलंबित  
राष्ट्रीय

महिलेचे फोटो काढले, जाब विचारला तर पिस्तूल रोखली; दिल्ली मेट्रोत गोंधळ, CISF जवान निलंबित

दिल्ली मेट्रोमध्ये CISF जवानाने महिला प्रवाशाचे परवानगीशिवाय फोटो काढल्याचा प्रकार समोर आला. महिलेने जाब विचारल्यावर जवानाने नकार दिला; मात्र प्रवाशांनी मोबाईल तपासला असता त्यात तिचे फोटो आढळले...

Mayuri Gawade

दिल्ली : ज्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे महिला प्रवाशांना मेट्रोमध्ये सुरक्षित वाटावे, त्याच यंत्रणेतील एका जवानावर महिला प्रवाशाचे तिच्या परवानगीशिवाय फोटो काढल्याचा गंभीर आरोप झाला आहे. महिलेने जाब विचारल्यानंतर संबंधित CISF जवानाने सुरुवातीला फोटो काढल्याचे नाकारले. मात्र, प्रवाशांनी त्याचा मोबाइल तपासला असता त्यामध्ये संबंधित महिलेचे फोटो काढल्याचा प्रकार समोर आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत CISFने संबंधित जवानाला निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दिल्ली मेट्रोच्या एका डब्यात हा प्रकार घडला. एका महिला प्रवाशाला CISF जवान तिचे आणि आणखी एका महिलेचे मोबाइलवर फोटो काढत असल्याचे लक्षात आले. तिने याबाबत जवानाला जाब विचारला आणि त्याचा मोबाइल दाखवण्यास सांगितले.

मात्र, जवानाने फोटो काढल्याचे नाकारले. त्यानंतर काही प्रवाशांनी त्याचा मोबाइल तपासण्यास सुरुवात केली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यात प्रवासी जवानाचा मोबाइल तपासत असल्याचे दिसते.

मोबाइलमध्ये फोटो सापडल्याचा दावा

मोबाइलची गॅलरी तपासल्यानंतर त्यामध्ये संबंधित महिलेचे फोटो आढळल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर महिलेने ते फोटो डिलीट करण्यास सांगितले. तिने जवानाच्या हातातून मोबाइल घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही प्रवाशांनी जवानाला थांबवल्याने परिस्थिती चिघळली. प्रवासी आणि जवानामध्ये वाद तसेच धक्काबुक्की झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सर्व्हिस पिस्तूल काढल्याचा आरोप

वाद वाढल्यानंतर संबंधित जवानाने आपले सर्व्हिस पिस्तूल बाहेर काढून प्रवाशांच्या दिशेने रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर तो मेट्रोमधून उतरून प्लॅटफॉर्मवर गेल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, पिस्तूल नेमक्या कोणत्या परिस्थितीत काढण्यात आले आणि ते प्रवाशांच्या दिशेने रोखले होते का, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या बाबींचाही विभागीय चौकशीत तपास केला जाणार आहे.

AIIMS मेट्रो स्थानकावर पोलिसांना कॉल

दिल्ली मेट्रो पोलिसांच्या सूत्रांनुसार, घटनेबाबत रात्री सुमारे १२.४० वाजता पीसीआर कॉल प्राप्त झाला होता. हा प्रकार AIIMS मेट्रो स्थानकावर घडल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

मात्र, संबंधित महिला प्रवाशाने या प्रकरणी औपचारिक तक्रार दाखल केली नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती त्यानंतर CISFच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.

CISFकडून जवान निलंबित

घटनेची गंभीर दखल घेत CISFने संबंधित जवानाला तात्काळ निलंबित केले आहे. महिला प्रवाशाशी कथित गैरवर्तनाच्या या प्रकरणाची सविस्तर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मोबाइलमधील फोटो, समोर आलेला व्हिडीओ, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी केली जाणार आहे. चौकशीतील निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे CISFकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या गोपनीयतेशी संबंधित असा प्रकार समोर आल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित जवानावर करण्यात आलेले आरोप चौकशीत कितपत सिद्ध होतात, हे पुढील तपासानंतर स्पष्ट होईल. मात्र, घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना! पहाटे गाढ झोपेत असतानाच हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा करूण अंत, अनेकजण गंभीर, VIDEO

तारापूर MIDC मध्ये भीषण स्फोट; परिसरात धुराचे प्रचंड लोट, कारखान्याचे पत्रेही उडाले, Video

Bihar : श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना! अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी; ७ महिला भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी; VIDEO

Mumbai : बाप्पाच्या विसर्जनापूर्वी खड्डेमुक्त रस्ते होणार; महापौरांचे समन्वय समितीला आश्वासन

तरुणाने डायव्हिंगमध्ये रचले दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; संभाजीनगरच्या रतीश कुलकर्णी यांची प्रेरणादायी कामगिरी