नवी दिल्ली : दिल्लीतील बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्लाच असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केले. लाल किल्ल्याजवळ झालेल्या या दहशतवादी हल्ल्याबाबत बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला व या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच पीडितांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली. दरम्यान, दिल्ली बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांकडे एक नाही तर दोन कार असल्याचा पोलिसांना संशय आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ठराव वाचून दाखवला की, मंत्रिमंडळाने या दहशतवादी घटनेचे वर्णन "राष्ट्रविरोधी शक्तींनी केलेले घृणास्पद कृत्य" असे केले आहे. याप्रकरणी तपास यंत्रणांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुन्हेगार व त्यांच्या साथीदारांची ओळख पटावी आणि त्यांना शिक्षा होण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. तसेच दहशतवादाविरुद्ध सरकारचे शून्य-सहिष्णुतेचे धोरण आहे, असा इशाराही यावेळी देण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने दहशतवादाच्या सर्व स्वरूपांना कठोरपणे मोडून काढण्याचे जाहीर केले. राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेबाबत असलेल्या आपल्या बांधिलकीनुसार सर्व भारतीयांच्या जीवन आणि कल्याणाचे रक्षण करण्यासाठी सरकार ठाम आहे.
लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर चर्चा करायला पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे सहभागी झाले होते. या बैठकीत सुरक्षा यंत्रणांचा अहवाल व भविष्यातील रणनीतीवर चर्चा झाली.
देशात २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट होता
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांनी देशात २०० बॉम्बच्या सहाय्याने २६/११ सारख्या हल्ल्याचा कट आखला होता. दिल्लीचा लाल किल्ला, इंडिया गेट, कॉन्स्टिट्यूशन क्लब आणि गौरी शंकर मंदिर ही ठिकाणे स्फोटासाठी लक्ष्य करण्याचा कट होता.
अल-फलाह विद्यापीठातून सूत्रे हलवली
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांचा गट फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठात सूत्रे हलवत होता. या स्फोटाचा कट जानेवारीपासून आखला जात होता. फरीदाबाद येथून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिद हिने सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून ती स्फोटके जमा करत होती. शाहीन व तिच्या साथीदारांनी मिळून उच्चशिक्षित लोकांचा दहशतवादी गट बनवला व ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘अन्सार गजवत-उल-हिंद’ या संघटनेशी ते संपर्कात होते.
दुसरी फोर्ड इकोस्पोर्ट कार हरयाणात सापडली
दिल्ली स्फोटात दहशतवाद्यांकडे एक नव्हे तर दोन कार होत्या. लाल रंगाच्या फोर्ड इकोस्पोर्ट कारचा क्रमांक DL10-CK-0458 हा होता. ही कार हरयाणाच्या खंदावली गावात सापडली आहे. ही कार डॉ. उमर उन नबी यांच्या नावाने नोंदणीकृत आहे.
मोदींनी जखमींची केली विचारपूस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एलएनजेपी रुग्णालयात जाऊन लाल किल्ला स्फोटातील जखमींची भेट घेतली. कटाच्या सूत्रधारांना कठोर शिक्षा ठोठावण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
भूतान दौऱ्यावरून परतल्यानंतर मोदी यांनी तत्काळ एलएनजेपी रुग्णालयात धाव घेतली. पंतप्रधान जवळपास २५ मिनिटे रुग्णालयात होते. पंतप्रधान मोदी यांनी जखमींशी संवाद साधला आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.