राष्ट्रीय

Breaking News : दिल्ली हादरली! लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

राजधानी दिल्लीत अतिमहत्त्वाच्या आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी भीषण स्फोट झाल्याने खळबळ उडाली. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये अचानक स्फोट झाला.

नेहा जाधव - तांबे

राजधानी दिल्लीत अतिमहत्त्वाच्या आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी भीषण स्फोट झाल्याने खळबळ उडाली. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये अचानक स्फोट झाला. या स्फोटानंतर जवळच उभ्या असलेल्या इतर ३-४ वाहनांनाही आग लागली. तर, स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या दुकानाच्या काचा फुटल्या. दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी संध्याकाळी अंदाजे ६.३० ते ६.४५ दरम्यान घडली. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या १० गाड्या दाखल झाल्या आहेत.

स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून दहशतवादी कटातून हा हल्ला झाला का? याचाही शोध घेतला जात आहे. घटनास्थळी बॉम्ब स्क्वॉड, फॉरेन्सिक तज्ञ, आणि एनएसजी टीमही दाखल झाली आहे.

दिल्लीमध्ये हाय अलर्ट

या घटनेनंतर लाल किल्ला परिसर पूर्णपणे सील केला असून, आसपासच्या सर्व मार्गांवर तपासणी सुरू आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला आहे. संशयित वाहनांची चौकशी वाढवली आहे.

ज्या ठिकाणी घटना घडली तेथील एका दुकानदाराने स्फोटाची भीषणता सांगितली, की "मी दुकानात बसलो होतो अचानक मोठा आवाज झाला. धमाका झाला. मी अक्षरश: जमिनीवर कोसळलो. स्फोट इतका भीषण होता, की मी उठता उठता तीनदा पडलो. माझे पाय अजूनही थरथरत आहेत. जणू काही जमीन फाटली असं वाटलं."

दहशतवादी कटाची पार्श्वभूमी?

महत्त्वाचे म्हणजे, गेल्या काही दिवसांत दिल्ली पोलिसांनी आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून चार दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक आणि डिजिटल नेटवर्किंग सामग्री जप्त करण्यात आली होती. त्यामुळे या स्फोटाकडे सुरक्षा यंत्रणा दहशतवादी कारवाईची शक्यता या दृष्टीकोनातूनही पाहत आहेत.

परिसरात तणाव, जनता सतर्क

लाल किल्ला हा ऐतिहासिक तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा परिसर असल्याने ही घटना सुरक्षा दृष्ट्या गंभीर मानली जात आहे. नागरिकांना अफवा न पसरविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी सतर्कता वाढवण्यात आली आहे.

Iran-US-Israel युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी 'आवश्यक वस्तू कायदा' लागू, जाणून घ्या अर्थ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी घोषणा; १ वर्षापर्यंत प्रसूती रजेसह 'लवकर या आणि लवकर जा' ची सुविधा

मुंबईतील हॉटेल्स बंद होणार? LPG टंचाईमुळे हॉटेल उद्योग संकटात; काळ्या बाजारातून गॅस खरेदीची भीती

बारावीच्या प्रश्नपत्रिकेतील QR कोड चर्चेत; स्कॅन करताच वाजलं 'रिकरोल' गाणं, CBSE कडून स्पष्टीकरण, पाहा Video

कुवेतमध्ये अडकलेला लेक मायदेशी परतला; अभिनेत्री विशाखा सुभेदार भावूक, "१० दिवसांनी मुलाला पाहिलं…"