दिल्लीत ५ मजली PG इमारत जमीनदोस्त; एकाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती 
राष्ट्रीय

दिल्लीत ५ मजली PG इमारत जमीनदोस्त; एकाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

दिल्लीत सत्य निकेतन परिसरातील ५ मजली PG इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला असून, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. NDRF आणि आपत्कालीन पथकांकडून बचावकार्य सुरू आहे.

Mayuri Gawade

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी (दि.०६) दुपारी पाच मजली इमारत कोसळल्याची भीषण घटना घडली. या इमारतीत मुलांचं PG सुरू होतं. दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका पथकांकडून बचावकार्य सुरू आहे.

'पीटीआय'च्या वृत्तानुसार, दुपारी सुमारे १.३० वाजता नानकपुरा गुरुद्वाराजवळ ही दुर्घटना घडली. पोलिसांना १.३४ वाजता इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आतापर्यंत काही जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं असून, अडकलेल्या लोकांची नेमकी संख्या अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेली नाही.

PGची पाच मजली इमारत क्षणात कोसळली

कोसळलेली इमारत ‘Hostel Daze’ या नावाने ओळखली जात होती. या PGमध्ये सुमारे १५ खोल्या होत्या आणि एका खोलीत साधारण दोन ते तीन विद्यार्थी राहत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं.

हा परिसर दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसजवळ असल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी येथे PGमध्ये राहतात. मोतीलाल नेहरू कॉलेज, आत्माराम सनातन धर्म कॉलेज आणि श्री वेंकटेश्वर कॉलेजमधील अनेक विद्यार्थी या परिसरात राहतात.

वीकेंडमुळे अनेक विद्यार्थी घरी गेले होते

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दुर्घटना रविवारी झाल्याने अनेक विद्यार्थी वीकेंड असल्यामुळे आपल्या घरी गेले होते. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत इमारतीत कमी विद्यार्थी उपस्थित होते. "कामकाजाचा दिवस असता तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती," अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

दरम्यान, पावसामुळे काही विद्यार्थी आपल्या खोल्यांमध्येच होते, तर काही जण बाहेर गेले होते. ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकले आहेत, याबाबत बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच स्पष्टता येणार आहे.

तळघरात बांधकाम सुरू असल्याचा दावा

स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित इमारत सुमारे २० वर्षे जुनी होती. दुर्घटनेच्या वेळी तळघरात काही बांधकाम सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे. तळघरात पाणी साचत होतं आणि इमारतीचा पाया कमकुवत झाल्याचा दावाही काही स्थानिकांनी केला आहे. मात्र, इमारत नेमकी कशामुळे कोसळली, याबाबत अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.

दिल्लीमध्ये शुक्रवारपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने या घटनेत पावसाचा काही संबंध आहे का, याचीही तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.

अरुंद रस्त्यांमुळे बचावकार्यात अडथळे

सत्य निकेतन परिसरातील रस्ते आणि गल्ल्या अरुंद असल्याने अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांना घटनास्थळी पोहोचताना अडचणी आल्याचं स्थानिकांनी सांगितलं. सुरुवातीच्या काळात स्थानिक नागरिकांनीही हाताने आणि उपलब्ध साधनांच्या मदतीने मलबा हटवत बचावकार्याला मदत केली.

पोलिसांनी परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन केलं असून, रुग्णवाहिका आणि बचाव पथकांना मार्ग मोकळा ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस आणि निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी इमारतीच्या मालकाची ओळख पटवली असून, त्याचा शोध घेण्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत. इमारत कोसळण्यामागचं नेमकं कारण आणि बांधकामाशी संबंधित नियमांचं उल्लंघन झालं होतं का, याचा पुढील तपास सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले