नवी दिल्ली : घरी पत्नी आणि दोन मुलं असतानाही मित्राच्या २० वर्षीय मुलीशी लग्न करण्याची इच्छा एका ४७ वर्षीय विवाहित पुरुषाच्या जीवावर बेतली. दिल्लीतील वजीरपूर औद्योगिक परिसरात मित्राच्या मुलीला लग्नाची मागणी घालण्यासाठी गेलेल्या पुरुषाने नकार मिळाल्यानंतर कारखान्यातच स्वतःला पेटवून घेतलं. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचं नाव संदीप असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर येथील रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या आत्महत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे.
मित्राच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा
आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संदीप हा उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर येथे पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होता. तो आपल्या एका मित्राच्या घरी वारंवार जात असे. त्यातून त्याची मित्राच्या २० वर्षीय मुलीशी ओळख झाली. संदीपला या तरुणीबद्दल प्रेमभावना निर्माण झाल्या होत्या, असं पोलिसांनी सांगितलं.
संबंधित तरुणी दिल्लीतील वजीरपूर औद्योगिक परिसरातील भांड्यांच्या कारखान्यात काम करत असून, ती दिल्लीत एकटी राहते. संदीप तिच्याशी नियमितपणे फोनवर बोलायचा. मात्र, काही काळापासून तरुणीने त्याच्याशी बोलणं बंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर संदीप गुरुवारी दिल्लीला पोहोचला.
कारखान्यात नेमकं काय घडलं?
शुक्रवारी संदीप थेट तरुणी काम करत असलेल्या कारखान्यात गेला. तिथे त्याने तिला लग्नाची मागणी घातली. मात्र, तरुणीने त्याचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर संदीपने कारखान्यातच स्वतःला पेटवून घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं.
त्याचा आरडाओरडा ऐकून कारखान्यातील कामगार मदतीसाठी धावले. त्यांनी आग विझवून संदीपला तातडीने दीपचंद बंधू रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काय?
या घटनेनंतर पोलिसांना संदीपने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये त्याने तरुणीसोबतची कथित मैत्री बिघडल्याचा उल्लेख केला होता. तसेच त्यासाठी तरुणीला जबाबदार धरल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र, संबंधित तरुणीने संदीपसोबत कोणतेही प्रेमसंबंध असल्याचा दावा फेटाळला आहे. त्यामुळे संदीपने चिठ्ठीत केलेल्या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, पोलिसांनी संदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.