फडणवीसांची दिल्लीत अमित शहांशी गुप्त बैठक; आज सुनेत्रा पवार घेणार मोदी-शहांची भेट 
राष्ट्रीय

फडणवीसांची दिल्लीत अमित शहांशी गुप्त बैठक; आज सुनेत्रा पवार घेणार मोदी-शहांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री अचानक दिल्ली गाठून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. मध्यरात्रीपर्यंत बैठका सुरू होत्या. त्यानंतर मंगळवारी पहाटे ते मुंबईत परतले. दरम्यान, त्यांच्या दिल्ली भेटीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Krantee V. Kale

नवी दिल्ली : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री अचानक दिल्ली गाठून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. सोमवारी मध्यरात्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू होता, त्यानंतर मंगळवारी पहाटे फडणवीस मुंबईत दाखल झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, मित्रपक्षांमधील समन्वय आणि आगामी राजकीय वाटचाल यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरही खलबते झाल्याचे बोलले जात आहे. आता फडणवीस यांच्या दिल्ली भेटीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यासुद्धा लवकरच दिल्लीला जाणार असल्याचे समजते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. फडणवीस यांच्या या तातडीच्या आणि गोपनीय दिल्ली दौऱ्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. विलीनीकरणाबाबत राज्यातील मित्रपक्षांमध्येही चर्चा सुरू झाली आहे.

सुनेत्रा पवार मोदी-शहांची भेट घेणार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंगळवारी सायंकाळी दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हेदेखील असतील. बुधवारी सुनेत्रा पवार या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. ही ‘सदिच्छा भेट’ असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात येत असले तरी, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मंगळवारी मंत्रालयात पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यापूर्वी अजित पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना सुनेत्रा पवार भावुक झाल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार मंगळवारी पहिल्यांदा मंत्रालयात आल्या. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील दालनात त्यांनी खात्याची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी सुनेत्रा पवार या अजितदादांच्या आठवणींनी भावुक झाल्या. दरम्यान, पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी सकाळी प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी

एका फ्लॅटमुळे संपूर्ण इमारतीचा पुनर्विकास रोखू शकत नाही - मुंबई उच्च न्यायालय

Mumbai : पिसे पांजरपोळ जलबोगद्याला मंजुरी; पाणीगळती, पाणी चोरीच्या घटनांना लगाम