X (ANI)
राष्ट्रीय

घुसखोरांना मतदार बनवण्याचा तृणमूलचा कट; देवेंद्र फडणवीस यांचा कोलकाता येथे आरोप

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने निवडणूक यादीत घुसखोरांच्या नावांचा समावेश करण्याचा मोठा कट रचला असल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केला.

Swapnil S

कोलकाता : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने निवडणूक यादीत घुसखोरांच्या नावांचा समावेश करण्याचा मोठा कट रचला असल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केला. ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (एसआयआर) प्रक्रियेला तृणमूलने विरोध केला असला, तरी ज्यांची नावे कायदेशीर कारणांमुळे हटवण्यात आली आहेत, अशा नागरिकांनी कोणताही निषेध केलेला नाही, असेही त्यांनी यावेळी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

राष्ट्रीय सुरक्षेला धोका

पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागातील लोकसंख्याशास्त्रीय रचनेत घुसखोरीमुळे मोठे बदल झाले आहेत, जे राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे. ज्यांची नावे योग्य कारणांमुळे मतदार यादीतून वगळली गेली, त्यांनी तक्रार केलेली नाही. मग केवळ तृणमूल काँग्रेसलाच याचा त्रास का होत आहे, सर्वोच्च न्यायालयाने या प्रक्रियेवर काही निरीक्षणे नोंदवली असली तरी ती थांबवलेली नाही, असे असूनही तृणमूलला ही प्रक्रिया पूर्णपणे रोखायची होती, असे फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, दर १० वर्षांनी अशी विशेष सुधारणा मोहीम राबवून मृत, स्थलांतरित आणि अनधिकृत मतदारांची नावे हटवणे आवश्यक आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ‘फसवणुकीच्या मार्गाने’ विजय मिळवण्यासाठी तृणमूलने या प्रक्रियेला विरोध केल्याचा आरोप त्यांनी केला.

दहशतीचे राज्य

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवत फडणवीस म्हणाले, तृणमूल काँग्रेसने बंगालमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. मागील निवडणुकांनंतर भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली, त्यांचा छळ झाला आणि महिलांवर अत्याचार झाले. मात्र, आता हा अन्याय सहन केला जाणार नाही. जनतेने बदल घडवण्याचा निर्धार केला असून, या निवडणुकीत तृणमूलचा पराभव निश्चित आहे.

स्थलांतरितांचा मुद्दा

भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिकांवर हल्ले होत असल्याच्या तृणमूलच्या आरोपांचा त्यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला. उलट, बंगालमधील जनतेला रोजगारासाठी बाहेर का पडावे लागत आहे, याचा विचार तृणमूल सरकारने करावा. प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी जर लोकांना राज्य सोडावे लागत असेल, तर हे सरकारचे अपयश आहे, असा टोला त्यांनी लगावला. मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये बंगाली समाज मोठ्या थाटामाटात दुर्गापूजा साजरी करतो, असेही त्यांनी नमूद केले.

गुंतवणुकीत घट आणि भ्रष्टाचाराचे आरोप

बंगालमधील आर्थिक स्थितीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, तृणमूलच्या कार्यकाळात बंगाल गुंतवणुकीत पिछाडीवर पडला आहे. उद्योजक येथे गुंतवणूक करण्यास घाबरत आहेत. केंद्राकडून मिळालेल्या ५४,२९२ कोटी रुपयांच्या निधीचा कोणताही ‘ऑडिट रिपोर्ट’ राज्याकडे नाही, असे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

प्रमुख केंद्र

भाजपची सत्ता आल्यास बंगाल पुन्हा एकदा देशातील प्रमुख गुंतवणूक केंद्र बनेल आणि येथे ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ आणला जाईल. शेवटी, भाजपला ‘बाहेरील’ म्हणणाऱ्यांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, भाजपची स्थापनाच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालच्या भूमीत केली आहे, त्यामुळे भाजप हा बंगालच्या मातीचाच भाग आहे.

NEET-UG 2026 Re-Exam : विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षेसाठी १५ मिनिटे अधिक, रफवर्कसाठी जास्त जागा; NTA च्या नव्या घोषणा

भारताचा दिग्गज नेमबाज हरपला! मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन, ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mumbai : 'मीटरने चला' म्हटलं तर ३०० रुपयांची मागणी! BKC सार्वजनिक वाहतूक मोहिमेच्या पहिल्याच दिवशी रिक्षाचालकांविरोधात तक्रारी

Kalyan : 'माझी काय चूक?'; ५ तास ट्रेन लेट झाल्यामुळे प्लॅटफॉर्म तिकीट एक्सपायर, तरुणाकडून ५०० रुपयांचा दंड, VIDEO

यंदाचा एल निनो तीव्र रूप धारण करणार; तो भयंकर आणि खर्चिक ठरण्याची शास्त्रज्ञांना भीती