नवी दिल्ली : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीतील साकेत न्यायालयाने २०१८ मधील मानहानीच्या प्रकरणात सोमवारी (दि. २३) त्याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. विकास सांक्रित्यायन ऊर्फ विकास पांडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून न्यायालयाने हा आदेश दिला आहे. ध्रुव राठी सध्या प्रामुख्याने परदेशात वास्तव्यास असल्याने त्याला समन्स बजावण्यात अडचणी येत असल्याचे तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे या वॉरंटनंतर राठी भारतात आल्यास त्याला अटकेला सामोरे जावे लागू शकते.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अनम रईस खान यांनी हा आदेश दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
२०१८ मधील मानहानीचं प्रकरण
माहितीनुसार, मे २०१८ मध्ये ध्रुव राठीने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ अपलोड केला होता. 'BJP IT Cell Part II' असे या व्हिडीओचे नाव होते. 'I Support Narendra Modi' हे सोशल मीडिया पेज चालवणाऱ्या विकास पांडे यांना भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या व्हिडीओमध्ये करण्यात आला होता. राठीच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरूनही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा व्हिडीओ रिट्विट केला होता.
या व्हिडीओमुळे आपली प्रतिष्ठा मलिन झाल्याचा आरोप करत विकास पांडे यांनी २०१८ मध्ये ध्रुव राठी आणि अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मानहानीची कायदेशीर कारवाई सुरू केली होती.
यापूर्वीही जारी झाले होते जामीनपात्र वॉरंट
या प्रकरणात न्यायालयाने यापूर्वीही ध्रुव राठीविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. साकेत न्यायालयाने १७ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबर रोजी असे वॉरंट जारी केले होते. मात्र, न्यायालयातील कर्मचाऱ्याने राठीचे निवासस्थान बंद असल्यामुळे त्याला नोटीस बजावता आली नसल्याची माहिती न्यायालयाला दिली होती.
त्यानंतर न्यायालयाने हरियाणातील गुरुग्राम येथील त्याच्या पत्त्यावर पुन्हा समन्स पाठवण्याचे निर्देश दिले होते. ध्रुव राठीला जुलै २०१९ मध्ये पहिल्यांदा समन्स जारी करण्यात आले होते, अशी नोंदही न्यायालयाने केली आहे.
ध्रुव राठी परदेशात वास्तव्यास असल्याचा दावा
'बार अँड बेंच' च्या वृत्तानुसार, तक्रारदाराचे वकील समक्ष शर्मा यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना ध्रुव राठी प्रामुख्याने ऑस्ट्रियामध्ये वास्तव्यास असल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्याला समन्स बजावण्यात अडचणी येत असल्याचा दावा त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी ध्रुव राठी भारतात आला होता आणि दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) आयोजित केलेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झाला होता, असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, १२ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती करणारा अर्ज मंजूर केला होता. तसेच ध्रुव राठीला 'दस्ती' म्हणजेच प्रत्यक्ष हातोहात समन्स बजावण्यास परवानगी दिली होती.
पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी
आता न्यायालयाने ध्रुव राठीविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.