नवी दिल्ली : येत्या दसरा, दिवाळीला तुम्हाला रेल्वेचा प्रवास करायचा असल्यास अधिकृत तिकीट काढूनच तो करावा. कारण रेल्वेने येत्या सणासुदीला संपूर्ण देशात तिकीट तपासणी मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पोलिसांसह तिकीट तपासनीसांची पथके तैनात केली जाणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने सणासुदीच्या काळात तिकीट नसलेल्या आणि अनधिकृत प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष तिकीट-तपासणी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत विनातिकिट प्रवास करणाऱ्या पोलिसांवरही विशेष लक्ष असणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने २० सप्टेंबर रोजी सर्व महाव्यवस्थापकांना पत्र लिहून १ ते १५ ऑक्टोबर आणि २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरदरम्यान जोरदार तिकीट तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. तिकीट नसलेल्या आणि अनधिकृत प्रवाशांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यास सांगितले आहे. तसेच, १९८९ च्या रेल्वे कायद्यातील तरतुदींनुसार योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सर्वसामान्य माणसांसोबतच पोलिसही विनातिकीट असल्याचे रेल्वेला आढळले आहेत. गाझियाबाद ते कानपूरदरम्यान अनेक मेल-एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यांमध्ये शेकडो पोलीस प्रवास करत असल्याचे आढळले. आम्ही त्यांना दंड भरायला सांगितला. मात्र त्यांनी आमच्यासोबत हुज्जत घालायला सुरुवात केली, असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
भारतीय रेल्वे तिकीट तपासनीस संघटनेचे अध्यक्ष संजय सिंह यांनी सांगितले की, अनेकदा पोलीसच आमच्याविरोधात खोट्या केसेसमध्ये आम्हाला अडकवण्याची धमकी देतात. रेल्वे कर्मचारी, टीसी व सर्वसामान्यांसोबत पोलीस भांडत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत. अशा दादागिरी करणाऱ्या पोलिसांवर त्यांच्याशी संबंधित पोलीस विभागाने कारवाई करावी, अशी मागणी करताना पोलिसांच्या वागणुकीचा परिणाम अधिकृत तिकीट काढणाऱ्या प्रवाशांवरही होत आहे, असे ते म्हणाले. सामान्य लोकांबरोबरच पोलीस कर्मचारीही आमच्या रडारवर असतील कारण ते शीर्ष उल्लंघनकर्ते आहेत, असे ते म्हणाले.
विनातिकीट प्रवाशांकडून वसूल केले २२३१ कोटी
२०२३-२४ मध्ये रेल्वेने देशात फुकट्या रेल्वे प्रवाशांविरोधात मोहीम हाती घेतली होती. गेल्या वर्षभरात ३६१.४५ लाख विनातिकीट प्रवाशांना पकडले. त्यांच्याकडून २२३१.७४ कोटी रुपये दंड वसूल केला, असे माहिती अधिकारात उघड झाले.