राष्ट्रीय

देशभरात दसरा उत्साहात साजरा

नागरिकांनी आपट्याची पाने वाटून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिनिधी

नवी दिल्ली : मुंबईसह देशभरात मंगळवारी दसरा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यासमोरील मैदानात श्री धार्मिक लीला समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात भाग घेतला. ही समिती १९२४ पासून दिल्लीत रामलीला उत्सवाचे आयोजन करत आहे. मुर्मू यांच्या हस्ते तेथे रावणदहन पार पडले.

नवी दिल्लीतील द्वारका येथे दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात रावणाच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन करून दुर्जनांवरील सज्जनांचा विजय साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना विजयादशमीच्या शुभेच्छा देत देशाला विभाजित करणाऱ्या जातीयवाद, प्रदेशवाद आदी शक्तींना पराभूत करण्याचे आवाहन केले. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही राजधानीतील विविध कार्यक्रमांत सहभाग नोंदवला.

पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी भारत-तिबेट सीमेवर तैनात असलेल्या इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाच्या जवानांना या दलाच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे लष्करी जवानांसह शस्त्रपूजा करत दसरा साजरा केला. यावेळी राजनाथ सिंह यांनी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्यासह चीन सीमेवरील लष्करी तयारीची पाहणी केली.

मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे शिवसेना (उबाठा) नेते उद्धव ठाकरे यांनी आणि आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र दसरा मेळावे घेतले. नागपूर येथे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा सभेत भाग घेतला. कोल्हापूर येथील दसरा चौक मैदानात शाही पद्धतीने दसऱ्याचे शमीपूजन पार पडले.

देशभरातील नागरिकांनी विजयादशमीचा सण पारंपरिक उत्साहात साजरा केला. घरे, रस्ते, दुकाने आदींवर झेंडूच्या फुलांच्या माळा, आंब्याचे डहाळे, गहू आणि भाताच्या ओंब्या लावून सजावट करण्यात आली होती. नागरिकांनी आपट्याची पाने वाटून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सोन्या-चांदीचे दागिने, वाहने, कपडे आदी खरेदीसाठी बाजारपेठा ओसंडून वाहत होत्या. आबालवृद्धांनी सणाचा आनंद भरभरून लुटला.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती