नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या काळातील व्हिडीओ फुटेज व छायाचित्रांची साठवणूक करण्याच्या नियमात बदल केला आहे. आता निवडणूक निकालानंतर केवळ ४५ दिवस सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत.
निवडणुकीनंतर ४५ दिवसांच्या आत निवडणूक आयोगाकडे कोणतीही याचिका न आल्यास ती माहिती नष्ट केली जाणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना कळवले आहे. निवडणूक काळातील सीसीटीव्ही फुटेजचा दुरुपयोग होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेत व्हिडीओग्राफी व फोटोग्राफी कायदेशीररीत्या अनिवार्य नाही. मात्र, त्याचा वापर अंतर्गत व्यवस्थापन कामासाठी केला जातो. पूर्वी वेगवेगळ्या नोंदी १ महिने ते १ वर्षापर्यंत ठेवल्या जात होत्या.
निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या नवीन निर्देशात म्हटले की, सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवण्यासाठी व्हिडीओग्राफी व फोटोग्राफीचा वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जे उमेदवार नव्हते, त्यांनी हे काम केले. कोणताही कायदेशीर उपयोग होणार नाही, अशा माहितीचा बाहेर उपयोग करण्यात आला. त्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत विचार करून हा निर्णय घेतला आहे.
निवडणूक आयोग पूर्वी नामांकन भरण्यापूर्वीच्या कालावधीपासून तीन महिन्यांपर्यंत फुटेज सुरक्षित ठेवत होते. त्यावेळी नामांकन, प्रचार, मतदान केंद्र व मतमोजणी आदींचे रेकॉर्डिंग ६ महिने ते १ वर्षापर्यंत सुरक्षित ठेवले जात होते.