बँक घोटाळ्यांमध्ये घट; ED संचालकांचा दावा 
राष्ट्रीय

बँक घोटाळ्यांमध्ये घट; ED संचालकांचा दावा

देशात ‘ईडी’च्या कारवाईमुळे बँक फसवणूक, कॉर्पोरेट आणि रिअल इस्टेट घोटाळ्यांसारख्या आर्थिक गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे, असा दावा ‘ईडी’चे संचालक राहुल नवीन यांनी केला. ईडीच्या ७० व्या वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Swapnil S

नवी दिल्ली : देशात ‘ईडी’च्या कारवाईमुळे बँक फसवणूक, कॉर्पोरेट आणि रिअल इस्टेट घोटाळ्यांसारख्या आर्थिक गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे, असा दावा ‘ईडी’चे संचालक राहुल नवीन यांनी केला. ईडीच्या ७० व्या वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

सध्याच्या गुन्हेगारीचे स्वरूप बदलले असून त्यात क्रिप्टोकरन्सी, सायबर आर्थिक गुन्हे, दहशतवादाला वित्तपुरवठा, राष्ट्रविरोधी कारवाया आणि अमली पदार्थ तस्करी या गुन्ह्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. अमली पदार्थांशी संबंधित प्रकरणांना 'ईडी'ने उच्च प्राधान्य दिले असून, नोव्हेंबर २०२५ मधील लाल किल्ला स्फोटाच्या प्रकरणात 'ईडी'ने केलेली कारवाई त्याचे उदाहरण आहे. या प्रकरणात 'ईडी'ने फरिदाबाद येथील 'अल फलाह युनिव्हर्सिटी'चे अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी यांना गेल्या वर्षी अटक केली होती.

आर्थिक वर्षात २०२५-२६ मध्ये 'ईडी'ने ८१२ आरोपपत्रे दाखल केली आहेत, जी आधीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहेत. यात १५५ पुरवणी आरोपपत्रांचा समावेश आहे. तसेच संस्थेचा सध्याचा दोषसिद्धी दर ९४ टक्के आहे. खटला न्यायालयात प्रलंबित असलेल्या २,४०० पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये दोषींना शिक्षा होईल आणि गुन्ह्यातून कमावलेली संपत्ती जप्त केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, मनी लाँड्रिंग प्रकरणांमधील खटला मुख्य गुन्ह्याचा निकाल येईपर्यंत थांबवायचा की स्वतंत्रपणे सुरू ठेवायचा, यावर सर्वोच्च न्यायालयात विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

'ईडी'च्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली असून, 'रिस्क असेसमेंट मॅनेजमेंट कमिटी'सारख्या यंत्रणा उभारल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी आणि बनावट समन्स रोखण्यासाठी क्यूआर कोड आधारित प्रणाली सुरू केली आहे. याशिवाय, सुमारे २५ वर्षांपूर्वी रद्द झालेल्या 'फेरा' अंतर्गत दाखल असलेली प्रकरणे आगामी काही महिन्यांत निकाली काढण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

८१ हजार कोटींची मालमत्ता जप्त

गेल्या आर्थिक वर्षात 'ईडी'ने ८१,४२२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून, त्यात मागील वर्षाच्या तुलनेत १७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत जप्त करण्यात आलेली एकूण मालमत्ता २,३६,०१७ कोटी रुपये आहे. याशिवाय ६३,१४२ कोटी रुपयांची मालमत्ता मूळ मालक असलेल्या बँका, गुंतवणूकदार आणि घर खरेदीदारांना परत करण्यात आली आहे.

तुमच्याही मोबाईलवर अचानक मोठा इमर्जन्सी अलर्ट आला? घाबरू नका; सरकारकडून देशभरात चाचणी सुरू, वाचा सविस्तर माहिती

Mumbai : ‘नीट’ परीक्षेमुळे मध्य रेल्वेचा रविवारचा ब्लॉक रद्द; शनिवारी मेगाब्लॉक, रात्री ११.१६ वाजता CSMTहून शेवटची लोकल

जनगणना दोन टप्प्यात! नागरिकांनी डिजिटल पद्धतीने स्व-गणना करावी; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘जनगणना-२०२७’चा शुभारंभ

Nashik : कुंभमेळा विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण होणार; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन

Mumbai : पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्ग खड्डेमुक्त; टिकाऊ रस्त्यांसाठी ‘मायक्रो सर्फेसिंग’ तंत्रज्ञानाचा वापर