जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि SpaceX चे CEO एलॉन मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. एलॉन मस्क यांनी शनिवारी ईव्हीएम हटवण्याच्या मागणीबाबत एक्स (पूर्वीचे ट्वीटर) माध्यमावर पोस्ट केली. मशीन किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं, असं ते म्हणाले.
मानवीय किंवा AI च्या मदतीने हॅक होण्याचा धोका-
अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे दावेदार असलेल्या रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांची पोस्ट शेअर करताना एलॉन मस्क यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, मानवीय किंवा AI च्या मदतीने हॅक होण्याचा धोका आहे.
रॉबर्ट एफ केनेडी यांनी त्यांच्या पोस्टच्या सुरुवातीला प्युर्टो रिकोमधील निवडणुकीदरम्यान ईव्हीएममधील अनियमिततेबद्दल लिहिलं होतं. रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांनी असोसिएटेड प्रेसचा हवाला देत आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, प्युर्टो रिकोच्या प्राथमिक निवडणुकीत ईव्हीएमशी संबंधित अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. पेपर ट्रेलमुळं ही समस्या लक्षात आली आणि मतांची संख्या दुरुस्त झाली.
बॅलेट पेपरकडे पुन्हा वळायला हवं...
एलॉन मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, जिथं कोणताही पेपर ट्रेल नाही, तिथं काय होत असेल? त्यांचं मत मोजलं गेल्याची माहिती अमेरिकन नागरिकांनी करून घ्यायला हवी. निवडणुकांना हॅक केलं जाऊ शकत नाही. निवडणूकीतील इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेपापासून वाचण्यासाठी बॅलेट पेपरकडे पुन्हा वळायला हवं.
माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिलं उत्तर-
एलॉन मस्क यांच्या ईव्हीएम संदर्भातील वक्तव्यावर भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी उत्तर दिलं आहे. चंद्रशेखर यांनी एलॉन मस्क यांना टॅग करत म्हटलं आहे की, सुरक्षित डिजिटल हार्डवेअर बनवलं जाऊ शकतं.
प्रफुल पटेल यांची मस्क यांच्यावर टीका...
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांनी एलॉन मस्क यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, "एलॉन मस्कला सांगा तू गाड्या बनव तिथं आणि आम्हाला फुकटचे सल्ले देऊ नको. या निवडणूकीनंतर तोंड बंद झालंना की ईव्हीएम हॅक होतंय. माझ्या फायद्याचे असेल, बरं वाटतं. माझ्या फायद्याचं नसेल, तर ईव्हीएमला दोष द्यायचा..."
राहुल गांधींचे ट्वीटही चर्चेत...
दरम्यान राहुल गांधी यांनीही ईव्हीएमवर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलं आहे की, "भारतातील ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्स आहे, त्याच्याशी छेडछाड करण्याची परवानगी कुणालाच नाही. आपल्या निव़डणूकीतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जातीये. जेव्हा एखाद्या संस्थेला जबाबदारी सांभाळता येत नाही, तेव्हा लोकशाहीला धोका निर्माण होण्याची शक्यता असते."