EPFO च्या सेवा आता व्हॉट्सॲपवर; केंद्रीय मंत्री मनसुख मांडवियांच्या हस्ते प्रारंभ (Photo-X)
राष्ट्रीय

EPFO च्या सेवा आता व्हॉट्सॲपवर; केंद्रीय मंत्री मनसुख मांडवियांच्या हस्ते प्रारंभ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी या सुविधेचा प्रारंभ केला.

ईपीएफओच्या व्हॉट्सॲप सेवेच्या माध्यमातून भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) सभासद आता आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम, अलीकडील पाच व्यवहारांची माहिती आणि पासबुक पाहू शकणार आहेत. तसेच पीएमव्हीबीआरवायशी संबंधित आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन आणि मदतही मिळणार आहे, अशी माहिती कामगार मंत्रालयाने निवेदनाद्वारे दिली.

या सुविधेमुळे नेहमीच्या सेवा मोबाईलवर सहज उपलब्ध होतील आणि त्यासाठी ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरज कमी होईल. ईपीएफओच्या ७४व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मांडविया यांनी निष्क्रिय ईपीएफ खात्यांमधील पात्र रकमेच्या स्वयंचलित निकाली काढण्याच्या सुविधेचाही प्रारंभ केला.

आधार पडताळणी पूर्ण झालेल्या आणि एक हजार रुपयांपर्यंत शिल्लक असलेल्या निष्क्रिय ईपीएफ खात्यांच्या सभासदांना स्वतंत्र दावा दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. आवश्यक ओळख आणि बँक खाते पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ईपीएफओकडून संबंधित रक्कम स्वयंचलितपणे हस्तांतरित केली जाणार आहे. या सुविधेचा सुमारे एक लाख खात्यांना लाभ होण्याची अपेक्षा असून, त्याअंतर्गत पाच कोटी रुपयांची रक्कम वितरित केली जाण्याचा अंदाज आहे.

या कार्यक्रमात सात प्रकाशनांचेही अनावरण करण्यात आले. ज्ञाननिर्मिती, संस्थात्मक शिक्षण, कायदेशीर जागरूकता आणि संवेदनशील प्रशासनाप्रती ईपीएफओची बांधिलकी या प्रकाशनांतून अधोरेखित करण्यात आली.

दावा निकाली काढण्याचा कालावधी २.५७ दिवस

ईपीएफओच्या सीआयटीईएस २.०१ या तंत्रज्ञानाधारित परिवर्तनाचे परिणामही यावेळी सादर करण्यात आले. केंद्रीय भविष्य निर्वाह निधीच्या दाव्यांच्या निपटाऱ्यात लक्षणीय सुधारणा झाली असून, ऑक्टोबर २०२६ मध्ये दावे निकाली काढण्यासाठी लागणारा सरासरी कालावधी कमी होऊन २.५७ दिवसांवर आला आहे. सदस्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील बचतीचा लाभ अधिक वेगाने आणि सुलभतेने मिळावा, यासाठी ईपीएफओकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

इंडिया आघाडीचा पुन्हा एल्गार! ज्ञानेश कुमार नसते तर मोदी पंतप्रधान झालेच नसते : राहुल गांधी; रामलीला मैदानावर SIR विरोधी महारॅली

LPG Price Hike : दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर

Mumbai : काजू-अंजीर कतली, बर्फीनेही खाल्ला भाव; खरेदीसाठी आधीच बुकींग

GST संकलनाचा विक्रम; ऑक्टोबरमध्ये २.३१ लाख कोटींचे विक्रमी संकलन

महादेव बेटिंग अ‍ॅपचा सूत्रधार सौरभ चंद्राकरचे भारतात प्रत्यार्पण