राष्ट्रीय

पोटगीच्या नावावर संपत्तीचे समान वाटप चुकीचे; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

पोटगीच्या नावावर पतीच्या संपत्तीचे समान वाटप करणे चुकीचे आहे, अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे. पोटगी ही पतीशी बरोबरी करण्यासाठी नाही तर चांगले जीवन जगण्यासाठी आहे, असेही कोर्टाने सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : पोटगीच्या नावावर पतीच्या संपत्तीचे समान वाटप करणे चुकीचे आहे, अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे. पोटगी ही पतीशी बरोबरी करण्यासाठी नाही तर चांगले जीवन जगण्यासाठी आहे, असेही कोर्टाने सांगितले.

सुप्रीम कोर्टाचे न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. पंकज मिथल यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली.सुप्रीम कोर्टात एका दाम्पत्याने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यांचे लग्न २०२१ मध्ये झाले होते. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले.

पत्नीने कोर्टात दावा केला की, माझ्या पतीचा ५ हजार कोटींचा व्यवसाय आहे. अमेरिका व भारतात अनेक मालमत्ता आहेत. आपल्या पतीने त्यांच्या पहिल्या पत्नीशी विभक्त होताना तिला ५०० कोटींची मालमत्ता व घर दिले होते. त्यामुळे मलाही घटस्फोटानंतर मोठी रक्कम मिळायला हवी.

दोघांचे संबंध सुधारण्याच्या पलीकडे गेल्याने सुप्रीम कोर्टाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली व पतीने याबाबत सर्वसमावेशक रक्कम म्हणून पत्नीला एका महिन्यात १२ कोटी रुपये द्यावेत, असे आदेश दिले.

खंडपीठाने सांगितले की, पोटगीच्या नावावर संपत्तीचे समान वाटप करणे योग्य नाही. पोटगीसाठी अनेक पक्षकार आपल्या पतीची सांपत्तिक स्थिती व उत्पन्न उघड करतात. त्यानंतर त्या जोडीदाराकडून अर्धी संपत्ती मागतात. विभक्त झाल्यानंतर पती कंगाल झाल्यास पत्नी आपल्या माजी पतीला संपत्तीत समानतेचा हक्क देईल का? असा सवाल न्यायालयाने केला.

पोटगी ही पतीला शिक्षा देण्यासाठी नाही

पोटगी ही त्यांच्या कायदेशीर मदतीसाठी तयार केली आहे. त्याचा वापर पतीला शिक्षा देणे, धमकावणे व त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी किंवा जबरदस्तीने वसुलीसाठी करू नये, असे खंडपीठ म्हणाले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली