नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश आयोगाने द्यायला हवे होते. त्यांच्यावर ‘ओरडणे’ आणि ‘आक्षेपार्ह भाषा’ वापरण्याऐवजी चौकशी करायला हवी होती, असे मत माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांनी व्यक्त केले.
‘मतचोरी’च्या आरोपांवर निवडणूक आयोगाच्या प्रतिसादावर टीका करताना माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांनी म्हटले की, राहुल गांधींनी आरोप करताना वापरलेले बरेचसे शब्द जसे की ‘हायड्रोजन बॉम्ब’ ही केवळ राजकीय उपरोधात्मक भाषा आहे. मात्र त्यांनी उपस्थित केलेल्या तक्रारींची सविस्तर चौकशी होणे आवश्यक आहे.
निवडणूक आयोगाने ‘मतचोरी’चे आरोप नाकारताना सांगितले की, बिहारमधील ‘एसआयआर’मुळे मतदारयादीतून अपात्र आणि दुबार नावे वगळली जातील आणि कायद्यानुसार पात्र असलेल्या लोकांची नावे समाविष्ट केली जातील.
निवडणूक आयोगावरील टीका ऐकताना मला केवळ नागरिक म्हणूनच नव्हे तर माजी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणूनही खूप दु:ख होते. मीदेखील त्या संस्थेच्या उभारणीत हातभार लावला आहे. मला जेव्हा या संस्थेवर सातत्याने आरोप होताना दिसतात, तेव्हा मला काळजी वाटते. आयोगाने आत्मपरीक्षण करायला हवे आणि दबावांपासून स्वतःला वाचवून ठामपणे उभे राहायला हवे, असे कुरैशी म्हणाले.
लोकांचा विश्वास जिंकणे आयोगासाठी महत्त्वाचे असून विरोधी पक्षांच्या मागण्यांना अधिक प्राधान्य द्यायला हवे. सत्ताधारी पक्षाला तितक्या प्रमाणात सहानुभूतीची गरज नसते जितकी विरोधी पक्षाला असते," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मी निवडणूक आयुक्त असताना माझ्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की, विरोधकांना भेटायचे असेल तर लगेच वेळ द्या, त्यांचे ऐका, चर्चा करा. जर त्यांच्या मागण्या शक्य असतील आणि इतरांच्या खर्चावर नसतील तर त्यांना मान्यता द्या."
कुरैशी यांनी म्हटले की, राहुल गांधींवर शपथपत्र देण्याचा आग्रह करण्याऐवजी आयोगाने चौकशी करायला हवी होती. "तो विरोधी पक्षनेता आहे, एखादा रस्त्यावरचा माणूस नाही. तो लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे त्याच्याशी बोलताना वापरलेली भाषा आणि अभिनिवेश दोन्ही आक्षेपार्ह होते," असे ते म्हणाले.
कुरैशी म्हणाले की, केवळ विरोधी पक्षनेता नव्हे, तर कोणत्याही नागरिकाने तक्रार केली असती तरी नेहमीप्रमाणे चौकशीचे आदेश द्यायला हवेत.
आयोगाने ‘पँडोरा बॉक्स’ उघडला
बिहारमधील मतदार यादींच्या विशेष तीव्र पुनरावलोकनाच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने काम केले त्यावरही कुरैशींनी टीका केली. ते म्हणाले की, यामुळे आयोगाने ‘पँडोरा बॉक्स’ उघडला आहे आणि “भुंग्यांच्या घरट्यात हात घातला आहे”, ज्यामुळे शेवटी आयोगालाच नुकसान होईल.