चंदिगड : चार वर्षांच्या मुलासह सहा जणांची हत्या केल्याप्रकरणी शुक्रवारी रोहटक न्यायालयाने माजी कुस्ती प्रशिक्षक सुखविंदर याला फाशीची सजा ठोठावली आहे. रोहटकचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश गगन गीत कौर यांनी सुखविंदरला भारतीय दंडविधानान्वये हत्या, हत्येचा प्रयत्न, चुकीच्या प्रकारे बंदिवासात डांबणे, पुरावे गायब करणे अशा कृत्यांच्या संबंधित कलमांखली दोषी ठरवले. त्याला १.२६ लाख रुपयांचा दंडही ठोठावला तर हत्येप्रकरणी फाशीची सजा सुनावली. सोनपत जिल्ह्यातील बरौदा गावातील रहिवासी सुखविंदरने १२ फेब्रुवारी २०२१ रोजी मनोज मलिक, त्यांची पत्नी साक्षी मलिक आणि त्यांचा मुलगा सरताज, कुस्ती प्रशिक्षक सतीश कुमार, परदीप मलिक, कुस्तीपटू पूजा यांची गोळ्या झाडून हत्या केली.