नवी दिल्ली : एकीकडे महागाई गगनाला भिडलेली असतानाच दुसरीकडे केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. केंद्र सरकारने अधिसूचना काढून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवणार असल्याची घोषणा केली असून ८ एप्रिलपासून हे शुल्क लागू होणार आहे. मात्र, यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. हे बदल मंगळवारपासून लागू होणार आहेत. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १३ रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपये करण्यात आले आहे.
तेलाच्या घसरत्या किमतीचा लाभ सरकारनेच मटकावला
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कपात करण्याची गरज होती. मात्र, केंद्र सरकारने हा लाभ ग्राहकांना न देता तो आपल्या तिजोरीत जमा करण्याची तजवीज उत्पादन शुल्कात वाढ करून केली आहे.
पेट्रोल -डिझेलच्या किरकोळ किमतीत वाढ नाही - केंद्र
उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली असली तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. हा खर्च पेट्रोलियम कंपन्यांकडून उचलला जाईल. सध्या सरकार उत्पादन शुल्क व अन्य करांद्वारे पेट्रोलवर प्रति लिटर १९.९० रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर १५.८० रुपये वसूल करत आहे. या वाढीनंतर पेट्रोलवर प्रति लिटर २१.९० रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर १७.८० रुपये इतका कर आकारला जाईल.