नवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्राचे भूमिपूजन आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यभाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ‘स्टुंडट फेडरेशन ऑफ इंडिया’ (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेने फडणवीस यांच्याविरोधात निदर्शने केली. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या धोरणांना विरोध करत विद्यार्थ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
‘जेएनयू’मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचा कोनशिला समारंभ आणि कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राचे उद्घाटन गुरुवारी झाले. तत्पूर्वी, येथील डाव्या विद्यार्थी संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. त्यामुळे, येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच ‘जेएनयू’तील सुरक्षारक्षकांनी विद्यार्थ्यांना रोखून ठेवले होते.
समाजात विष कालवण्याचे काम महाराष्ट्रातील राजकारण्यांकडून होत आहे. मुसलमांना टार्गेट केले जात आहे, असे म्हणत येथील ‘एसएफआय’च्या विद्यार्थ्यांनी फडणवीसांच्या दौऱ्याला आपला विरोध दर्शवला. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहात, असा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला.
भाषा हे संवादाचे माध्यम, वादाचे नाही - फडणवीस
“मराठी भाषेने संपूर्ण भारताला समृद्ध केले आहे. मराठी साहित्य उत्तम असून मराठी नाट्यसृष्टी देशातील सर्वोत्तम आहे. मराठी भाषेवर सगळीकडे आणि सगळ्या विद्यापीठांमध्ये संशोधन झाले पाहिजे. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. ते वादाचे माध्यम होऊच शकत नाही. मातृभाषा महत्त्वाची आहेच. प्रत्येक मराठी माणसाला मराठीचा अभिमान, स्वाभिमान आणि आग्रह आहे तो स्वाभाविकच आहे. मातृभाषेचा अभिमान असलाच पाहिजे, पण इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे, हेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण भारतीय भाषांचा तिरस्कार करतो आणि इंग्रजीला पायघड्या घालतो. त्यावेळी कुठेतरी दुःख होते,” असे फडणवीस म्हणाले.