कुवैतच्या मंगाफ शहरात एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागून घडलेल्या दुर्घटनेत ४५ भारतीयांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वाराणसी येथील शिवपूर भागातील गायत्री धाम कॉलनीतील ३६ वर्षीय प्रवीण माधव सिंह यांचाही समावेश आहे. दोनच महिन्यांपूर्वी ते १५ दिवसांच्या सुट्टीवर आले होते. सुट्टी संपल्यावर कुवैतला जाण्यापूर्वी प्रवीण आपले वृद्ध वडील जयप्रकाश सिंह यांना भेटले, यावेळी कुवैतला परत जायची इच्छा होत नाहीये, असं ते वडिलांना म्हणाले.
मी लवकरच माघारी येईन...
आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार, कुवैतला जायची इच्छा नसतानाही प्रवीण यांना नाईलाजास्तव जावं लागलं. कारण ज्या एनबीटीएस कंपनीत ते गेल्या ९ वर्षांपासून सेल्स कोऑर्डिनेटर पदावर काम करत होते, ती कंपनी १० वर्ष पूर्ण झाल्यानंतरच सर्व प्रकारचे फंड कर्मचाऱ्यांना परत करते. त्यामुळं मन मारून ते कुवैतला गेले होते. आपण कुवैतमध्ये डिसेंबर २०२४ पर्यंतच राहणार आहोत आणि पुन्हा बनारसला माघारी येणार आहोत, असं त्यांनी वडिलांना सांगितलं होतं. पण बुधवारी लागलेल्या भीषण आगीत प्रवीण यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आठवणीत त्यांचे आई-वडिल, पत्नी आणि दोन मुलींनी टाहो फोडला.
बीटेकचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर एनबीटीएस कंपनीत नोकरी-
राउलकेला येथे बीटेकचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रवीण माधव सिंह यांना कुवैतच्या ऑईल आणि फॅब्रिक बनवणाऱ्या एनबीटीएस कंपनीत नोकरी मिळाली होती. बुधवारी कुवैतमध्ये घडलेल्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समजल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला.
गाजीपूरच्या गहमर सेवराई तालुक्यातील करहिया हे प्रवीण यांचं मूळ गाव. दोन वर्षांपूर्वी त्यांनी वाराणसीतील शिवपूर येथील गायत्री धाम कॉलनीत घर बांधलं आणि त्यांचं कुटुंब तिथं राहू लागलं. प्रवीण यांच्या मृत्यूच्या बातमीनं कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला. प्रवीण यांचं शव कुवैतमधून दिल्ली येथे आलेलं आहे. शनिवारी सकाळी ते शिवपूर येथे त्यांच्या घरी पोहोचवलं जाईल.
मृतदेह घेऊन भारतीय हवाईदलाचं विमान परतलं-
कुवैत आग दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे मृतदेह घेऊन भारतीय हवाईदलाचं विमान केरळ येथील कोची एअरपोर्टवर लँड झालेलं आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना आणण्यासाठी भारतीय हवाईदलाचं सी-१३० जे सुपर हरक्युलिस विमान रवाना झालं होतं, ते आज कोचीमध्ये लँड झालं आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन स्वतः कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले.
गाढ झोपेत असताना काळाचा घाला-
कुवैतच्या मीडियानुसार, स्वयंपाकघरात आग लागली होती. बहुतेकांचा मृत्यू धुरामुळं झाला. बुधवार १२ जून रोजी सकाळी ४:३० वाजताच्या सुमारास अल-अहमदी गव्हर्नरेटच्या अधिकाऱ्यांना दुर्घटनेची माहिती दिली गेली. सर्वजण गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडली. एनबीटीसी ग्रुपनं १९५ कर्मचाऱ्यांकरिता इमारत भाड्यानं घेतली होती. यामध्ये बहुतांश कर्मचारी केरळ, तमिळनाडू आणि उत्तर भारतातील राज्यांमधील होते.