हरियाणातील फरीदाबाद येथे एका २५ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला धावत्या व्हॅनमधून (मारुती ईको व्हॅन) रस्त्यावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फरीदाबाद पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, पीडित तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडितेच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी गंभीर जखमी असल्याने जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेच्या बहिणीने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पीडित तरुणीचा पतीशी वाद झाल्याने ती काही दिवसांपासून आई-वडिलांकडे राहत होती. सोमवारी सायंकाळी घरात आईशी भांडण झाल्यानंतर ती सेक्टर-२३ मध्ये राहणाऱ्या मैत्रिणीकडे गेली होती.
रात्री घरी यायला उशीर झाल्याने ती ऑटो-रिक्षाने एनआयटी-२ चौकात पोहोचली आणि तेथून मेट्रो चौकापर्यंत चालत गेली. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास ती कल्याणपुरीकडे जाण्यासाठी मेट्रो चौकात ऑटोची वाट पाहत उभी होती. तेव्हा एका व्हॅनमधून आलेल्या दोन व्यक्तींनी तिला लिफ्ट दिली.
लिफ्टच्या बहाण्याने गुन्हा
तरुणी व्हॅनमध्ये बसल्यानंतर आरोपींनी कल्याणपुरीकडे गाडी न नेता गुरुग्राम रोडच्या दिशेने वळवली. त्यानंतर व्हॅनमध्येच तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. काही तास गाडी फिरवल्यानंतर पहाटे ३ वाजता राज चौकाजवळ तिला गाडीतून रस्त्यावर फेकून दिले.
या घटनेत तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेतही तिने आपल्या बहिणीला फोन करून घटनेची माहिती दिली. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले त्यावेळी ती रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. त्यानंतर तिला तातडीने बादशाह खान रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दोन आरोपी अटकेत
या प्रकरणाचा तपास करताना सेक्टर-४८ गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. हे दोघे मूळचे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील असून सध्या फरीदाबादमध्ये राहत होते. गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती ईको व्हॅनही पोलिसांनी जप्त केली आहे.
फरीदाबाद पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत."
या घटनेमुळे फरीदाबाद परिसरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.