श्रीनगर : जम्मू-काश्मीर आणि तेथील जनतेबाबत भारताच्या हेतूवर शंका उपस्थित करून पाकिस्तान मुळेच काश्मिरी सुरक्षित आहेत, असे धक्कादायक वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी केले. डॉ. अब्दुल्ला यांच्या वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद जोरदार उमटू लागले असून भाजपने त्याचा समाचार घेतला आहे.
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला शहरात पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी वरील वक्तव्य केले. ते म्हणाले की, पाकिस्तान विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत आहे, ज्यामुळे येथील लोक टिकून आहेत. "पाकिस्तान अनेक ठिकाणी जाऊन काश्मिरी लोकांबद्दल बोलत आहे. म्हणूनच जम्मू-काश्मीरचे लोक वाचत आहेत. अन्यथा, काश्मिरी लोकांबाबत भारताचा हेतू योग्य नाही," असे ते म्हणाले.
स्वायत्ततेबाबत भाष्य
सध्याच्या प्रशासनाप्रमुखांचा संदर्भ देत फारुख अब्दुल्ला म्हणाले, मी त्यांना विचारले की तुम्ही स्वायत्तता संपवली आहे का, त्यांनी माझ्या तोंडावर ते मान्य केले. यासोबतच, दिल्लीकडून न्यायाची काय अपेक्षा ठेवली जाऊ शकते, असा सवालही त्यांनी केला. लोकांना त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवण्याचे आवाहन करत ते म्हणाले, त्यांचा सामना करण्याचे धाडस ठेवा, जर तुम्ही तसे केले नाही, तर तुम्ही नष्ट होऊन जाल. लोक देशाचे शत्रू नाहीत, आम्ही देशासोबत पुढे जाऊ आणि देशासाठी बलिदानही देऊ, परंतु आज जे सत्तेत आहेत त्यांना मी सांगतो की त्यांनी स्वतःला सुधारले पाहिजे, असे ते म्हणाले.
आरोग्य क्षेत्रावरून प्रशासनावर टीका
फारुख अब्दुल्ला यांनी उपराज्यपाल कार्यालयावर निशाणा साधत आरोग्य क्षेत्राशी संबंधित फाईल्स गेल्या एक वर्षापासून प्रलंबित असल्याचा आरोप केला. जम्मू-काश्मीरमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रुग्णालयांमध्ये दोन वर्षे सेवा द्यावी लागते आणि त्यांनी तसे न केल्यास त्यांना राज्याला ४० लाख रुपये द्यावे लागतात. यासंदर्भातील फाईल गेल्या एक वर्षापासून उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडे पडून असून त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे ते म्हणाले. वैद्यकीय संस्थांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ते म्हणाले की, पूर्वी वैद्यकीय संस्थांचे संचालक आणि समिती कोणती उपकरणे आणावीत आणि कोणत्या डॉक्टरांची नियुक्ती करावी हे ठरवत असत, मात्र सध्याच्या प्रशासनाने हे सर्व अधिकार काढून घेतले आहेत.
पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी मुख्यमंत्र्यांनी प्रश्न केला की, केवळ सरकार सत्तेत असतानाच राजकीय संघटनेशी जोडले राहण्याची प्रवृत्ती का असते, राजकीय निष्ठा ही सत्तेच्या पदांवर अवलंबून असू नये, पक्षाची ताकद ही निवडणुकीतील विजयावर नसून कार्यकत्यांच्या सचोटी आणि समर्पणावर अवलंबून असते, असे ते म्हणाले. आपण केवळ जनतेलाच नाही तर अल्लाहलाही उत्तर द्यायचे आहे, म्हणूनच आपण जनतेसमोर सत्य बोलतो, असे सांगून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.