जयपूर : आजपर्यंतचा सर्वात भीषण रस्ता अपघात जयपूरमध्ये शुक्रवारी सकाळी झाला. जयपूर-अजमेर महामार्गावर एलपीजी टॅंकरची ट्रकशी धडक झाल्यानंतर एलपीजी टँकरला भीषण आग लागून मोठा स्फोट झाला. त्यामध्ये आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ३५ जण जखमी झाले असून त्यापैकी १८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या स्फोटानंतर जवळच असलेल्या ४० वाहनांनाही आग लागली.
एलपीजीने भरलेल्या टँकरला आग लागल्यानंतर आगीचे गोळे आसमंतात पसरले. ही आग एक किलोमीटरपर्यंत दिसत होती. हा अपघात इतका भीषण होता की आगीत अडकलेल्या लोकांचे अंतर्वस्त्रही जळून खाक झाले. अशा परिस्थितीत लोकांनी कपडे काढून आपला जीव वाचवला.
या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये एलपीजी ट्रक यू-टर्न घेत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. यादरम्यान मागून येणाऱ्या एका ट्रकने एलपीजी ट्रकला जोरदार धडक दिल्याचे आणि त्यामुळे एलपीजी ट्रकचे नोजल तुटून गॅसगळती सुरू झाल्याचे आणि त्यानंतर काही सेकंदात मोठा स्फोट झाल्याचे दिसत आहे.
या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ३५ हून अधिक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी ५० टक्क्यांहून अधिक लोक ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाजले आहेत.
गंभीर जखमी झालेल्यांची संख्या अधिक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातात ४० वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. जखमी झालेल्यांवर जयपूरमधील सवाई मानसिंग (एसएमएस) रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उडणारे पक्षीही आगीच्या लोळात जळाले
हा स्फोट इतका भीषण होता की, आगीच्या ज्वाळांच्या चपेट्यात उडणारे पक्षीही सापडून जळाले. तर एका दुचाकीस्वाराने घातलेले हेल्मेट वितळून ते त्याच्या चेहऱ्यावर चिकटले आणि त्यामध्ये त्याचे डोळे जळाले. रुग्णालयात एक शव अशा स्थितीत होते की केवळ धडच दिसत होते. पाय आणि शीर गायब झाले होते.
सानुग्रह अनुदान
राजस्थान सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांचे, तर जखमींना एक लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांचे, तर जखमींना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा ‘एक्स’वरून केली आहे.