Photo : X (@DaleshwarRatre9)
राष्ट्रीय

माजी मुख्यमंत्री बघेल यांच्या मुलाला अटक

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला २,१०० कोटी रुपयांहून अधिकच्या मद्य घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ED) शुक्रवारी भिलाई येथील त्याच्या निवासस्थानातून अटक केल्याने राज्यात खळबळ माजली आहे.

Swapnil S

रायपूर : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला २,१०० कोटी रुपयांहून अधिकच्या मद्य घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी भिलाई येथील त्याच्या निवासस्थानातून अटक केल्याने राज्यात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे वाढदिवसाच्या दिवशीच चैतन्य याला अटक करण्यात आली आहे. भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कथित मद्य घोटाळा प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील कथित घोटाळ्यात २,१०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा गैरव्यवहार झाला आहे.

७० व्यक्ती, संस्थांची नावे

घोटाळ्यातील निधीचा काही भाग चैतन्य आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी चालवलेल्या रिअल इस्टेट कंपन्यांद्वारे वळवण्यात आला होता. ईडीचा ‘मनी लाँड्रिंग’ खटला छत्तीसगडच्या ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागा’ने (एसीबी) नोंदवलेल्या प्रथम माहिती अहवालावर (एफआयआर) आधारित आहे. या अहवालात माजी उत्पादन शुल्कमंत्री कवासी लखमा यांच्यासह ७० व्यक्ती आणि संस्थांची राज्याच्या मद्य धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात नावे आहेत.

बघेल यांची केंद्रावर टीका

अटक आणि छाप्यावर प्रतिक्रिया देताना भूपेश बघेल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. बघेल यांनी रायपूरमधील माध्यमांना सांगितले की, विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, जेव्हा आम्ही सभागृहात अदानी मुद्दा उपस्थित करण्याच्या तयारीत होतो, तेव्हा मोदी आणि शहा यांनी त्यांच्या मालकांना खूश करण्यासाठी ईडीला माझ्या घरी पाठवले. ते देशभरातील विरोधी नेत्यांना लक्ष्य करत आहेत. लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असे बघेल म्हणाले.

त्यांनी केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआय, आयकर आणि ‘डीआरआय’सारख्या तपास संस्थांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, एकीकडे निवडणूक आयोग बिहारमधील मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित करत आहे, तर दुसरीकडे या संस्थांना विरोधी पक्षांवर हल्ला करण्यासाठी शस्त्र म्हणून वापरले जात आहे. तरीही, आम्ही लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवतो आणि सहकार्य करत राहू, असे बघेल पुढे म्हणाले.

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

Noida Bus Fire : 'ती उतरल्यावरच मी उतरेन'; जळत्या बसमधून स्वतःचा जीव वाचवण्याऐवजी आईसोबत थांबला, मायलेकांचा करुण अंत

Mumbai : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत कार घुसली; ४ भाविक जखमी, संतप्त जमावाकडून गाडीची तोडफोड, VIDEO

शिवनेरीचे तिकीट आता व्हॉट्सॲपवरून बुक करता येणार; दादर-पुणे शिवनेरीसाठी एसटी महामंडळाची प्रायोगिक सुविधा