न्यू जलपैगुडी/कोलकाता/नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात सोमवारी सकाळी एका मालगाडीने कांचनगंगा एक्स्प्रेसला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून, ६० जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, कांचनगंगा एक्स्प्रेसचे डबे हवेत उचलले गेले. मृतांमध्ये दोन लोकोपायलट व एका गार्डचा समावेश आहे. या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व जखमी प्रवाशांची विचारपूस केली.
रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष जया सिन्हा वर्मा यांनी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास या अपघाताला मालगाडीचा लोकोपायलट जबाबदार असल्याचे म्हटले होते. मात्र, ‘पीटीआय’ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या रेल्वेमार्गावरील स्वयंचलित सिग्नल खराब होता, असे रेल्वेच्या अंतर्गत कागदपत्रातून उघड झाले आहे. रानीपात्राच्या स्टेशन मास्टरने मालगाडीच्या चालकाला जारी केलेल्या दस्तावेजानुसार, ‘टीए ९१२’मध्ये त्याला सर्व लाल सिग्नल पार करण्याची मंजुरी मिळाली होती. त्यामुळे मालगाडीच्या चालकाने गाडी सिग्नल नसतानाही पुढे नेली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला.
या अपघातातील जखमींना उत्तर बंगाल वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सिग्नल यंत्रणेत बिघाड
पश्चिम बंगालच्या रानीपात्रा रेल्वे स्टेशन आणि छत्तर हाट जंक्शनदरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेत सकाळी ५.५० पासून बिघाड होता. त्यामुळे अपघातग्रस्त कांचनगंगा एक्स्प्रेस राणीपात्रा रेल्वे स्टेशन व छत्तरहाट रेल्वे स्थानकादरम्यान थांबली होती. त्यानंतर रानीपात्रा रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्टरने कांचनगंगा एक्स्प्रेसला ‘टीए ९१२’ जारी केला. त्यानंतर सकाळी ८.४२ वाजता रंगापानी येथून निघालेल्या मालगाडीने कांचनगंगा एक्स्प्रेसला धडक दिली. या एक्स्प्रेसचे पाच डबे दुर्घटनाग्रस्त झाले. त्यातील गार्डचा डबा, जनरल डब्याचा चक्काचूर झाला. अपघातानंतर लष्कर, एनडीआरएफच्या पथकांनी बचाव काम पूर्ण केले. अपघातग्रस्त रेल्वे रूळ दुरुस्त करण्याचे कामही पूर्ण झाले आहे.
या अपघातानंतर कांचनगंगा एक्स्प्रेस सध्या अलुआबारी रेल्वे स्थानकात उभी करण्यात आली आहे. तेथे फिटनेस चाचणी झाल्यानंतर ती सियालदाहकडे रवाना केली जाईल.
या अपघाताबद्दल एका प्रवाशाने सांगितले की, रेल्वे अपघातानंतर मोठा आवाज झाला आणि रेल्वेगाडी तत्काळ थांबली. मालगाडीच्या धडकेने एक्स्प्रेसचे डबे उडाले. आम्ही चहा घेत असताना अचानक एक्स्प्रेस थांबली. त्याचा मोठा धक्का आम्हाला बसला. आमच्यासोबत गर्भवती महिलेचे कुटुंबही होते. या अपघातानंतर ती जागेवरून पडली. आम्हाला जणू भूकंपाचा धक्का बसल्याचे जाणवले. आम्ही कसेबसे स्वत:ला सावरले.
मृतांना १२ लाखांची मदत
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना अडीच लाख, तर किरकोळ जखमींना ५० हजार रुपये मदतीची घोषणा केली, तर पंतप्रधान मदतनिधीतून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख, जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.
अपघाताच्या चौकशीचे आदेश - रेल्वे मंत्री
कांचनगंगा एक्स्प्रेस अपघातानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तत्काळ दुपारी दार्जिलिंगला पोहोचले. दुचाकीवरून ते घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. अपघातस्थळी डॉक्टर्स, रेल्वे कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी व गावकऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सध्या अपघाताची चौकशी सुरू आहे. डेटा पॉइंट व डेटा लॉग तपासले जात आहेत. संपूर्ण चौकशीनंतर या अपघाताचे कारण समजू शकेल, असे वैष्णव म्हणाले.
या मार्गावर कवच यंत्रणा नव्हती - रेल्वे बोर्ड अध्यक्षा
रेल्वे बोर्डच्या अध्यक्षा जया वर्मा सिन्हा म्हणाल्या की, या मार्गावर कवच यंत्रणा नव्हती. आतापर्यंत १५०० किमी रेल्वेवर कवच यंत्रणा बसवण्यात आली आहे. वर्षअखेरपर्यंत ३ हजार किमीवर ‘कवच’ यंत्रणा बसवली जाणार आहे.
प्रवाशांच्या सुविधांकडे रेल्वेचे दुर्लक्ष - ममता
या अपघातप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, रेल्वे खात्याला प्रवाशांच्या सुविधांची पर्वा नाही. त्यांना अधिकारी, अभियंते, तांत्रिक कर्मचारी व कामगारांची पर्वा नाही. केंद्र सरकारला केवळ निवडणुकीची पर्वा आहे. त्यांनी रेल्वेच्या विकासकामांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.
राष्ट्रपती मुर्मू यांना दु:ख
रेल्वे अपघातप्रकरणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत्यू हे व्यथित करणारे आहेत. माझी संवेदना व प्रार्थना सर्व दु:खी कुटुंबांसोबत आहे. जखमी प्रवाशी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना मी करते, असे मुर्मू म्हणाल्या.
रेल्वे अपघात दुर्दैवी - पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पश्चिम बंगाल रेल्वे अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, रेल्वेचा हा अपघात दुर्दैवी आहे. या अपघातात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. तसेच जे लोक जखमी झालेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.