(Photo-X/@narendramodi)
राष्ट्रीय

आक्रमण थांबवा! ‘जी-२०’ शिखर परिषदेत जागतिक शांततेचा संदेश

दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राष्ट्रप्रमुख सहभागी झाले होते.

Swapnil S

जोहान्सबर्ग : कोणत्याही राष्ट्राने धमकीचा किंवा बळाचा वापर करून दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करून त्यांचे सार्वभौमत्व किंवा राजकीय स्वातंत्र्य धोक्यात आणू नये, असे आवाहन ‘जी-२०’ शिखर परिषदेच्या जाहीरनाम्यात करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राष्ट्रप्रमुख सहभागी झाले होते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यांचा विरोध न जुमानता सर्व सहभागी राष्ट्रप्रमुखांच्या सहमतीने हा जाहीरनामा स्वीकारण्यात आला. सामान्यतः परिषदेच्या अखेरीस जाहीरनामा स्वीकारला जातो, या परिषदेत मात्र तो सुरुवातीलाच स्वीकारण्यात आला.

सर्व देशांचे आपापसांत मैत्रीपूर्ण संबंध असावेत, मानवाधिकारांचा प्रसार करावा आणि मानवी हक्कांचे आदर करण्यास प्रोत्साहन दिले जावे, तसेच वंश, लिंग, भाषा किंवा धर्माचा विचार न करता सर्वांना मूलभूत अधिकार दिले जावेत, असेही आवाहन ‘जी-२०’ देशांकडून करण्यात आले.

भूराजकीय व भू-आर्थिक स्पर्धा वाढत असून संपूर्ण जगावर त्याचा प्रभाव पडत आहे, मात्र सर्वसमावेशक वाढीसाठी एकता, समानता आणि शाश्वतता हे मुख्य स्तंभ आहेत, असे या ३९ पानी जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले. तसेच ऊर्जा सुरक्षा, हवामान बदल, आपत्तीदरम्यान लवचिकता आणि प्रतिसाद यांचाही ठळकपणे उल्लेख करण्यात आला.

रशिया, इस्रायल आणि म्यानमारचा उल्लेख न करता, कोणीही दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करू नये असे आवाहन करत हा जाहीरनामा संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याशी सुसंगत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विविध देशांचा जागतिक समुदाय परस्परांशी जोडलेला आहे हे आम्ही मान्य करतो आणि बहुस्तरीय सहकार्य, स्थूल धोरण समन्वय, शाश्वत विकासासाठी जागतिक भागीदारी आणि ऐक्य यांच्या सहाय्याने कोणताही देश मागे राहणार नाही, यासाठी आमची कटिबद्धता याची आम्ही पुष्टी करतो, असेही जाहीरनाम्यात म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या गाठीभेटी

शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी गेलेल्या मोदी यांनी परिषदेदरम्यान विविध राष्ट्रप्रमुखांच्या भेटी घेतल्या. त्यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँन, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग, ब्राझीलचे अध्यक्ष लुइस इन्सासिओ लुला डिसिल्वा आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचा समावेश होता.

Iran-US-Israel युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी 'आवश्यक वस्तू कायदा' लागू, जाणून घ्या अर्थ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी घोषणा; १ वर्षापर्यंत प्रसूती रजेसह 'लवकर या आणि लवकर जा' ची सुविधा

मुंबईतील हॉटेल्स बंद होणार? LPG टंचाईमुळे हॉटेल उद्योग संकटात; काळ्या बाजारातून गॅस खरेदीची भीती

बारावीच्या प्रश्नपत्रिकेतील QR कोड चर्चेत; स्कॅन करताच वाजलं 'रिकरोल' गाणं, CBSE कडून स्पष्टीकरण, पाहा Video

कुवेतमध्ये अडकलेला लेक मायदेशी परतला; अभिनेत्री विशाखा सुभेदार भावूक, "१० दिवसांनी मुलाला पाहिलं…"