नवी दिल्ली : दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांनी त्यांचे सहकारी आणि गुजरातचेच दुसरे उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा बहुमान मिळवला आहे. अदानी समूहाच्या बंदरे ते ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या सततच्या वाढीमुळे त्यांच्या एकूण संपत्तीत मोठी भर पडली आहे.
ताज्या क्रमवारीनुसार, ९२.६ अब्ज डॉलर संपत्तीसह अदानी यांनी अंबानींना (त्यांची संपत्ती ९०.८ अब्ज डॉलर आहे) मागे टाकत भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान पटकावले आहे.
आपल्या नावाच्या समूहाचे संस्थापक असलेले अदानी हे भारतातील सर्वात मोठ्या खासगी बंदर नेटवर्कचे प्रमुख आहेत. तसेच ते देशातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा उत्पादक आणि खासगी विमानतळ चालकदेखील आहेत. ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स’ या जगातील ५०० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या दैनंदिन यादीत अदानी सध्या १९ व्या क्रमांकावर आहेत.
अदानींच्या संपत्तीचा मोठा हिस्सा त्यांच्या समूहातील १० सूचीबद्ध कंपन्यांमधील शेअर्समधून येतो. भारताचा आर्थिक विस्तार आणि ऊर्जा संक्रमण या क्षेत्रांशी निगडित असलेल्या अदानींच्या मालमत्तांकडे गुंतवणूकदारांचा मोठा कल दिसून येत आहे.
ऊर्जा, टेलिकॉम आणि रिटेल क्षेत्रात पसरलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत त्या तुलनेत माफक वाढ झाल्याने क्रमवारीत हा बदल झाला आहे.
अदानी समूहाने वाहतूक, लॉजिस्टिक्स, ऊर्जा, विमानतळ, संरक्षण, डेटा सेंटर्स, सिमेंट आणि मीडिया अशा अनेक क्षेत्रांत आपला विस्तार केला आहे. २०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या व्यावसायिक साम्राज्याचे नेतृत्व करणारे गौतम अदानी हे भारताचे पहिले ‘फर्स्ट जनरेशन’ (स्वकर्तृत्वावर उभे राहिलेले) उद्योजक ठरले आहेत.
जागतिक स्तरावर एलन मस्क अव्वल
जागतिक अब्जाधीशांच्या यादीत टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क ६५६ अब्ज डॉलरसह अव्वल स्थानी आहेत. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे सह-संस्थापक लॅरी पेज २८६ अब्ज डॉलरसह दुसऱ्या तर ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस २६९ अब्ज डॉलरसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जगातील पहिल्या ५० श्रीमंतांच्या यादीत अदानी आणि अंबानी हे दोनच भारतीय आहेत.
चढाओढीचा इतिहास
फेब्रुवारी २०२२ : अदानींनी प्रथमच अंबानींनामागे टाकले होते.
हिंडेनबर्ग अहवाल : अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्येमोठी घसरण झाली होती. यामुळे अंबानी पुन्हा अव्वल स्थानी आले होते.
२०२४-२०२५ : २०२४ च्या मध्यंतरात अदानींनी पुन्हा आघाडी घेतली होती. परंतु २०२५ च्या मध्यंतरात अंबानी पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर आले. आता एप्रिल २०२६ मध्ये अदानींनी पुन्हा हे स्थान मिळवले आहे.