राष्ट्रीय

सहकार क्षेत्रात पारदर्शकतेसाठी जेम पोर्टल उपयुक्त

आज देशभरातील सर्व सहकारी समित्यांसाठी सरकारी ई-बाजाराचे, जेमचे दरवाजे खुले झाले आहेत

वृत्तसंस्था

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे सहकारी संस्थाना जेम अर्थात सरकारी ई-मार्केट प्लेस (GeM) वर आणण्याची व्हर्च्युअल सुरुवात केली. केंद्रीय सहकार मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ तसेच सरकारी ई-बाजार उपक्रमाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य तसेच उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की भारताच्या इतिहासात आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. वर्ष १९४२ मध्ये ९ ऑगस्ट याच दिवशी गांधीजींनी इंग्रज सत्तेविरुद्ध ‘भारत छोडो’ आंदोलनाची सुरुवात केली होती आणि आता स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ९ ऑगस्टच्याच दिवशी आणखी एक महत्त्वाचे कार्य संपन्न होत आहे. आज देशभरातील सर्व सहकारी समित्यांसाठी सरकारी ई-बाजाराचे, जेमचे दरवाजे खुले झाले आहेत. ते म्हणाले की सहकार क्षेत्रात अमर्याद संधी आहेत आणि या क्षेत्राच्या वाढीसाठी सरकारी ई-बाजार पोर्टल अत्यंत उपयुक्त मंच ठरेल.

स्वातंत्र्यानंतर या क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले , मात्र ऐतिहासिक सुधारणा आणि आधुनिकीकरणाच्या सहाय्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी या क्षेत्राच्या विस्ताराला गती देत आहेत, असे सहकार मंत्री म्हणाले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली ज्या दिशेने जेमचा (जीईएम) प्रवास सुरु आहे तो पाहून त्याच्या भविष्याबद्दल खूप आशावादी असल्याचे, सहकार मंत्र्यांनी सांगितले.

सहकाराचे मॉडेल हे असे मॉडेल आहे की ज्यामध्ये कमी पुंजीसह लोक एकत्र येऊन मोठ-मोठी कामे सहज करू शकतात, असे सहकार मंत्र्यांनी सांगितले. काळानुरूप कोणतीही व्यवस्था बदलली नाही तर ती कालबाह्य ठरते, सहकार क्षेत्राच्या विस्तारासाठी त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. आपल्या देशातील सहकार व्यवस्था ११५ वर्षे जुनी आहे, कायदेही खूप जुने आहेत, त्यात वेळोवेळी काही बदल झाले; पण काळानुरूप आमूलाग्र बदल आणि आधुनिकीकरण झालेले नाही, असे ते म्हणाले.

सहकार क्षेत्राला आता कोणीही दुय्यम लेखू शकत नाही; मात्र आपल्यालाही बदलाची सुरुवात करावी लागेल, पारदर्शकतेच्या दिशेने पुढे जावे लागेल आणि स्वतःला सज्ज करावे लागेल. सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी जेम (जीईएम) पोर्टल अत्यंत उपयुक्त ठरेल आणि जेव्हा पारदर्शकता येईल तेव्हा शेतकरी आणि दूध उत्पादकांचा सहकारी संस्थांवरील आणि त्यांच्या सभासदांवरील विश्वास वाढेल, असे अमित शाह यांनी सांगितले. जेम (जीईएम) पोर्टल आणून मोदीजींनी सरकारी खरेदीत पारदर्शकता आणण्याचे काम केले आहे, ही एक नवीन प्रणाली आहे, सुरुवातीला काही प्रशासकीय समस्या असू शकतात; परंतु कोणालाही त्याच्या हेतूवर शंका असता कामा नये , असे ते म्हणाले.

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर