नवी दिल्ली : जागतिक अनिश्चितता, वाढती गुंतवणुकीची मागणी आणि मध्यवर्ती बँकांकडून होणारी सातत्यपूर्ण खरेदी या पार्श्वभूमीवर येत्या ६ ते १२ महिन्यांत देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम रु. १.६० ते १.६८ लाखांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे सध्याच्या घसरणीच्या काळात खरेदीची उत्तम संधी उपलब्ध होत असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या ताज्या मौल्यवान धातूंच्या त्रैमासिक अहवालात मध्यम कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर ४,५०० ते ४,७०० डाॅलर प्रति औंस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तर अल्पमुदतीत देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर रु. १.४८ लाख प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतात.
यूएस फेडरल रिझर्व्हने सप्टेंबरमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची वाढ करून व्याजदर ३.७५-४% केला. यामुळे कडक आर्थिक धोरणांबद्दल चिंता वाढली आहे. भारतात वाढत्या किमतींमुळे दागिन्यांच्या खरेदीवर काही प्रमाणात मर्यादा आल्या आहेत; मात्र लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठीची मागणी कायम आहे. २०२५ मधील एकतर्फी तेजीच्या तुलनेत यंदा बाजारात मोठे चढ-उतार आहे.
सणासुदीची मागणी आणि परताव्याचा ट्रेंड पारंपरिक खरेदी
दिवाळी आणि धनत्रयोदशी हे मौल्यवान धातूंच्या खरेदीसाठी अत्यंत महत्त्वाचे सण मानले जातात. लग्नसोहळे आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे या काळात खरेदीचा जोर असतो. ऐतिहासिक आकडेवारीनुसार, सणासुदीच्या मागणीचा प्रभाव आंतरराष्ट्रीय किमतींपेक्षा देशांतर्गत प्रीमियम, आयात आणि प्रत्यक्ष खरेदीच्या प्रमाणावर अधिक पडतो.