राष्ट्रीय

सरकारच्या धोरणांमुळे वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनत आहोत - गौतम अदानी

अदानी यांनी ऊर्जा क्षेत्रात ७० अब्ज डॉलर किंवा ५.५९ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत

वृत्तसंस्था

“सरकारला श्रेय द्यायला हवे की त्यांनी आपली भूमिका चोख बजावत सर्वांगीण समतोल राखून आव्हाने पेलली. सरकारच्या धोरणांमुळे कोविड महामारीतून बाहेर पडताना आम्ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनत आहोत, तर जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या अर्थव्यवस्थांना मंदीचा धोका आहे, असे प्रतिपादन अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी केले.

अदानी समूहाच्या एजीएममध्ये मंगळवारी कंपनीच्या भागधारकांना संबोधित करताना त्यांनी म्हटले की, त्यांच्या व्यवसायाचे आकडे पाहता, मला खात्री आहे की, यावर्षी देशाच्या जीडीपीचे आठ टक्क्यांचे उद्दिष्ट नक्की गाठता येईल. अदानी यांनी ऊर्जा क्षेत्रात ७० अब्ज डॉलर किंवा ५.५९ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.

ते म्हणाले की, अदानी समूह ग्रीन हायड्रोजनला भविष्यातील इंधन बनवण्याच्या दिशेने काम करणार आहे. अदानी समूहाच्या वतीने भारताला तेलाच्या निव्वळ आयातदारापासून ग्रीन हायड्रोजनचा निर्यातदार बनवण्याच्या स्पर्धेत आघाडीवर आहे. समूहाची वाढ देशाच्या वाढीच्या कथेशी निगडीत आहे. असा त्यांचा विश्वास असल्याने भारतात गुंतवणूक करण्यापासून ते कधीही मागे हटले नाहीत. सरकारच्या आत्मनिर्भर भारताच्या व्हिजन अंतर्गत आम्ही डेटा सेंटर्स, डिजिटल अॅप्स, इंडस्ट्रियल क्लाउड, संरक्षण, एरोस्पेस, धातू आणि मटेरियल्स अशा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्याचवेळी अदानी समूहाचे मार्केट कॅप यंदा २०० डॉलर बिलियन (१५.९६ लाख कोटी) पर्यंत वाढले आहे.

ते म्हणाले की, आम्हाला हवामान बदलावर व्याख्याने दिली जातात, परंतु आम्ही जगातील अशा काही देशांपैकी एक आहोत ज्यांनी कोविड महामारी आणि ऊर्जा संकट असतानाही अक्षय ऊर्जेचा वापर केला आहे. या क्षेत्रात चांगली प्रगती झाली आहे. आपल्या देशात हे काम अशा वेळी शक्य झाले आहे, जेव्हा जगातील काही विकसित देशांनी अक्षय ऊर्जेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपक्रम थांबवले आहेत. अदानी यांनी म्हटले आहे की २०१५ पासून अक्षय ऊर्जा क्षेत्रात भारताची क्षमता ३०० टक्के वाढली आहे. अदानी यांच्या मते, अक्षय ऊर्जा क्षेत्रातील अदानी समूहाची ताकद आपल्याला भविष्यात हरित ऊर्जा 'भविष्यातील इंधन' बनविण्यात मदत करत आहे.

भारताला हरित ऊर्जा निर्यातदार देश बनवण्याच्या शर्यतीत अदानी समूह आघाडीवर आहे. हरित ऊर्जेच्या क्षेत्रात अदानी समूहाची ७० अब्ज डॉलरची गुंतवणूक याचा पुरावा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपटा हरवतोय…दसऱ्याचे सोने की नकली पाने? बाजारात कांचनच्या पानांचा सुळसुळाट

राज्यात आता २४ तास शॉपिंग उत्सव; मॉल्स, दुकानांसह सर्व आस्थापने उघडी ठेवण्यास सरकारची परवानगी

‘लाडक्या बहिणीं’साठी वडील, पतीचे ‘आधार’ सक्तीचे; राज्य सरकारचा निर्णय

ठाणे पालिकेचे उपायुक्त ACB च्या जाळ्यात; २५ लाखांच्या लाचप्रकरणी अटकेत

Mumbai : गरब्यात अंडी फेकल्याने गोंधळ; मीरारोडमधील घटना, काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल