राष्ट्रीय

GST ची हंडी उतरणार; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी केली दरात व्यापक बदलाची घोषणा

आत्मनिर्भर, शक्तिशाली व स्वाभिमानी भारताचे चित्र रंगवतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू व सेवा कराने (जीएसटी) हैराण झालेल्या जनतेला मोठा दिलासा देण्यासाठी त्यात व्यापक फेरबदलाची घोषणा केली. येत्या दिवाळीपासून ‘जीएसटी’त मोठे बदल केले जाणार आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : आत्मनिर्भर, शक्तिशाली व स्वाभिमानी भारताचे चित्र रंगवतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू व सेवा कराने (जीएसटी) हैराण झालेल्या जनतेला मोठा दिलासा देण्यासाठी त्यात व्यापक फेरबदलाची घोषणा केली. येत्या दिवाळीपासून ‘जीएसटी’त मोठे बदल केले जाणार आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रावर बेतलेली ‘आर्यन डोम’सारखी सुरक्षा प्रणाली विकसित करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. देशातील बेरोजगारीच्या संकटावर मात करण्यासाठी ३.५ कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी आदी विविध घोषणा पंतप्रधानांनी केल्या.

  •  शत्रूचे हल्ले परतवून लावण्यासाठी ‘मिशन सुदर्शन चक्र’

  •  भारतीय बनावटीच्या चिप्स वर्षअखेर बाजारपेठेत दाखल

  •  देशाला स्वदेशी जेट इंजिनाची गरज

  •  तेल, नैसर्गिक वायू उत्खनन मोहीम राबवणार

  •  अणु धमक्या सहन करणार नाही

देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून १०३ मिनिटे केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी विविध विषयांवर व्यापक भाष्य केले. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवल्यानंतर पंतप्रधानांनी देशाला मार्गदर्शन केले.

पंतप्रधान म्हणाले की, येत्या दिवाळीत जनतेसाठी ‘जीएसटी’ दरात मोठी कपात केली जाणार आहे. ‘जीएसटी’ला ८ वर्षे झाली असून आम्ही त्याचा आढावा घेतला. आम्ही त्यात सुधारणा करून कर प्रणाली सोपी व सहज केली. आता दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या किमती स्वस्त होतील. यंदाच्या दिवाळीत तुम्हाला दुप्पट धमाका मिळणार आहे. आम्ही राज्यांशी चर्चा केली असून ‘जीएसटी’त सुधारणा आणत आहोत. ज्यामुळे देशभरातील करांचा बोजा कमी होईल. सामान्य माणसाच्या वस्तूंवरील कर मोठ्या प्रमाणात कमी होतील. आमच्या ‘एमएसएमईं’ना मोठा फायदा होईल. दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, ज्यामुळे आमची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असे ते म्हणाले.

पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना

केंद्र सरकारने ‘पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’ सुरू केली आहे. या योजनेत ३.५ कोटी तरुणांना रोजगार देण्यात येणार आहे. त्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

स्वदेशी जेट इंजिनाची गरज

देशाला स्वदेशी जेट इंजिनाची गरज आहे. परदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी करतानाच राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे गरजेचे आहे. स्वदेशी जेट इंजिनासाठी देशातील तरुण वैज्ञानिक, अभियंता व सरकारच्या सर्व विभागांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

अणु धमक्या सहन करणार नाही

गेल्या काही दशकांपासून आम्ही दहशतवाद सहन करत आहे. दहशतवाद्यांनी देशाच्या छातीची चाळण केली आहे. आता आम्ही दहशतवादी व त्यांचे पालनपोषण करणाऱ्यांमध्ये फरक करणार नाही. अणु धमक्या आम्हाला पूर्वीपासून दिल्या जात आहेत. पण, आता आम्ही अणु धमक्या सहन करणार नाही, असे मोदी म्हणाले.

भारतीय चिप्स वर्षअखेर दाखल होणार

भारतीय बनावटीच्या चिप्स यंदाच्या वर्षअखेर बाजारात दाखल होतील. हा भारतीय तंत्रज्ञानाच्या प्रवासातील एक मैलाचा दगड ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

तेल, नैसर्गिक वायू उत्खनन मोहीम राबवणार

समुद्रतळाखालील तेल व नैसर्गिक वायूच्या शोधासाठी राष्ट्रीय जन शोधमोहिमेची घोषणा केली. ही मोहीम देशांतर्गत उत्पादनाला चालना देणारी व देशाचे अब्जावधी डॉलरचे बिल कमी करण्याच्या प्रयत्नाचा हिस्सा आहे.

मिशन सुदर्शन चक्र

शत्रूचे हल्ले परतवून लावण्यासाठी भारत ‘मिशन सुदर्शन चक्र’ मोहीम सुरू करत आहे. याद्वारे येत्या २०३५ पर्यंत सर्व सार्वजनिक ठिकाणांना सुरक्षा कवचाने सुरक्षित केले जाईल.

रक्त, पाणी एकत्र वाहणार नाही

रक्त व पाणी एकत्र वाहणार नाही, हे भारताने ठरवले आहे. भारताच्या नद्यांचे पाणी शत्रूच्या शेतीचे सिंचन करत आहे. माझ्या देशातील शेतकरी व जमीन पाण्यासाठी तडफडत आहे. सिंधू करार किती अन्यायपूर्ण व एकतर्फी होता, हे देशातील नागरिकांना समजले आहे. भारताच्या हक्क्याच्या पाण्यावर केवळ त्याचा अधिकार आहे. भारत आता सिंधू करार भविष्यात मानणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशासाठी मोठे योगदान

१०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला. ही १०० वर्षे राष्ट्र सेवेसाठी गौरवपूर्ण आहेत. संघाने व्यक्ती निर्माणपासून राष्ट्र निर्माणाचा संकल्प करून १०० वर्षे भारतमातेची सेवा केली. सेवा, समर्पण, संघटन आणि कठोर शिस्त आदी संघाची वैशिष्ट्ये राहिली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे, अशा शब्दांत मोदी यांनी संघाचे कौतुक केले.

भागवतांना खूश करण्यासाठी मोदींची संघ स्तुती - काँग्रेस

पंतप्रधानांनी मोहन भागवतांना खूश करण्यासाठी त्यांच्या भाषणात ‘आरएसएस’चा उल्लेख केला, कारण आता मोदी त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत. सप्टेंबरनंतर, जेव्हा ते ७५ वर्षांचे होतील, तेव्हा ते पदावर राहण्यासाठी मोहन भागवतांच्या मदतीवर अवलंबून आहेत, असा टोला काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदींना लगावला.

लोकसंख्येच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता

देशातील लोकसंख्येच्या बदलत्या स्वरूपाबाबत पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. देशातील वाढत्या समस्येबाबत मी तुम्हाला सतर्क करू इच्छितो, असे सांगून मोदी म्हणाले की, देशात घुसखोर लोक तरुणांच्या रोजगारावर गदा आणत आहेत. हे घुसखोर लोक देशातील बहिणी व मुलींना ‘टार्गेट’ करत असून हे आम्ही सहन करणार नाही. हे घुसखोर सामान्य आदिवासींची दिशाभूल करून त्यांच्या जमिनी बळकावत आहेत. सीमेवरील भागात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येत बदल होत आहे. हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे आहे, असे ते म्हणाले.

मुंबईत NOTA झाला मोठा! कोणत्या प्रभागात सर्वाधिक वापर, कुठे अत्यल्प प्रतिसाद? बघा टॉप ५ लिस्ट

दिल्लीनंतर आता मुंबईत उभारणार 'बिहार भवन'; जागा ठरली, ३० मजली इमारतीसाठी ३१४ कोटीही मंजूर

Kalyan : देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर रेल्वे सुरू; मलंगगडाची २ तासांची चढाई अवघ्या १० मिनिटांत, पहिले दोन दिवस मोफत प्रवास

महापालिका निवडणुकांत ‘नोटा’ चा राजकीय इशारा! ठाणेकरांमध्ये असंतोष; उल्हासनगरमध्ये नाराजीचा स्फोट

स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेन एकमेकांना धडकल्या; २१ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती