प्रेम केलं, घरच्यांचा विरोध झुगारून लग्नही केलं आणि सुखाचा संसार सुरू झाला. मात्र, सात वर्षांनंतरही प्रेमविवाहाचा राग शांत झाला नाही. मराठी चित्रपट 'सैराट'ची आठवण करून देणारी धक्कादायक घटना गुजरातमधील राजकोट येथे घडली आहे. बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून सख्ख्या भावाने आपल्या बहिणीच्या नवऱ्याची भररस्त्यात चाकूने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपीने अवघ्या २३ सेकंदांत तब्बल १३ वार केले. या हत्येचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सात वर्षांपूर्वीचा प्रेमविवाह ठरला वादाचं कारण
समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचं नाव विमल वानिया (२७) असं असून, तो राजकोटमधील सहकार रोड परिसरात राहत होता. विमलने सात वर्षांपूर्वी शीतल हिच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र, शीतलच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे त्यांनी शीतलशी संबंध तोडले होते. शीतलचा भाऊ कमलेश धांदल याच्या मनातही या प्रेमविवाहाबद्दल राग होता. दरम्यान, विमलने पत्नीसाठी नवीन वाहन खरेदी केलं होतं. त्याच्या नोंदणीसाठी त्याने सासरच्या घराचा पत्ता दिला होता. याच कारणावरून जुना वाद पुन्हा उफाळून आल्याचं सांगितलं जात आहे.
आरसी बुक देण्याच्या बहाण्याने बोलावलं
२४ सप्टेंबर रोजी राजकोटमधील भक्तिनगर सर्कल परिसरात ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, वाहनाचं आरसी बुक आपल्या घरी आल्याचं सांगत कमलेशने विमलला एका दुकानाजवळ बोलावलं होतं. विमल तिथे पोहोचल्यानंतर सुरुवातीला दोघांमध्ये बोलणं झालं. त्यानंतर कमलेशने विमलला दुकानातून बाहेर ओढत दुचाकीजवळ नेलं. तिथे त्याला मारहाण करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अवघ्या २३ सेकंदांत १३ वार!
सीसीटीव्ही फुटेजनुसार, मारहाणीनंतर कमलेशने कमरेला लपवलेला चाकू बाहेर काढला आणि विमलवर सपासप वार केले. अवघ्या २३ सेकंदांत त्याने सुमारे १३ वार केल्याचं वृत्त आहे. गंभीर जखमी झालेला विमल रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळला. आजूबाजूचे नागरिक जमा होऊ लागताच कमलेश दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला. विमलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.
'माझ्या भावाला फाशीची शिक्षा द्या'; पत्नीचा आक्रोश
पतीच्या हत्येनंतर शीतलने आपल्या सख्ख्या भावाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. आरसी बुक देण्याच्या बहाण्याने पतीला बोलावून त्याची हत्या केल्याचा आरोप तिने केला आहे. या घटनेमुळे शीतल आणि तिच्या लहान मुलाचा आधार हिरावला गेला आहे. आपल्या भावाने विश्वासघात केल्याचा आरोप करत शीतलने त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. विमलच्या कुटुंबीयांनीही आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
आरोपीला अटक; CCTV च्या आधारे तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच भक्तिनगर पोलीस ठाण्याचं पथक, गुन्हे शाखा आणि एलसीबी झोन-१ चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शीतलच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपी कमलेश धांदल याला अटक केली आहे. या प्रकरणात त्याच्या कथित साथीदारालाही अटक झाल्याचं वृत्त आहे. हत्येमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत.