गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड X
राष्ट्रीय

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड

ग्वाल्हेरमध्ये एका तरुणाच्या कारवर त्याच्या मैत्रिणीने तब्बल ३४०० लिपस्टिक 'किस मार्क' उमटवले. VIDEO व्हायरल होताच वाहतूक पोलिसांनी कारचा शोध घेत मालकाला ५,५०० रुपयांचा दंड ठोठावला.

Mayuri Gawade

मध्य प्रदेश : सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी केलेला एक भन्नाट प्रयोग ग्वाल्हेरमधील तरुणाला चांगलाच महागात पडला. एका तरुणाच्या मैत्रिणीने त्याच्या संपूर्ण कारवर लिपस्टिकचे तब्बल ३४०० 'किस मार्क' उमटवले. तरुणाने त्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आणि काही वेळातच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र, हा व्हिडीओ ग्वाल्हेर वाहतूक पोलिसांच्याही नजरेस पडला. पोलिसांनी कारचा शोध घेत तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड ठोठावला. एवढंच नाही, तर कारवरील लिपस्टिकच्या सर्व खुणाही त्याच्याकडून पुसून घेण्यात आल्या.

सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

ग्वाल्हेर वाहतूक पोलिसांचे निरीक्षक अभिषेक रघुवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी लिपस्टिकच्या खुणांनी भरलेल्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एएनआयनेही या घटनेचा व्हिडीओ शेअर केला.

व्हायरल व्हिडीओमध्ये लिपस्टिकच्या ठशांनी भरलेली कार सिटी सेंटर परिसरात फिरताना दिसत होती. या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी ‘ऑपरेशन ईगल’ अंतर्गत कारचा शोध सुरू केला. त्यानंतर कार मालक आदित्य सिकरवार याची ओळख पटवून त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

कार मालकाला ५,५०० रुपयांचा दंड

वाहनात नियमबाह्य बदल केल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यानुसार आदित्यवर कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला ५,५०० रुपयांचे चलनही बजावण्यात आले. पोलिसांनी कार ताब्यात घेतल्यानंतर तिच्यावरील लिपस्टिकच्या सर्व खुणा आदित्यलाच पुसायला लावल्या. त्यानंतर त्याने दंडाची रक्कम भरली.

साडेतीन तासांत उमटवले ३४०० 'किस मार्क'

आदित्य सिकरवारने स्थानिक माध्यमांना सांगितले की, त्याच्या एका महिला मैत्रिणीने कारवर हे लिपस्टिकचे ठसे उमटवले होते. कार पार्क केल्यानंतर तो काही वेळासाठी तिथून दूर गेला होता. याच काळात मैत्रिणीने कारच्या संपूर्ण बॉडीवर लिपस्टिकचे ठसे उमटवले.

संपूर्ण कारवर हे मार्क तयार करण्यासाठी जवळपास साडेतीन तास लागल्याचे त्याने सांगितले. कारवर तब्बल ३४०० 'किस मार्क' उमटवण्यात आले होते. त्यानंतर आदित्यने या कारचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला.

'VIDEO व्हायरल व्हावा म्हणून केलं'

आदित्यच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार सोशल मीडियावरील एका 'फॉरेन ट्रेंड'पासून प्रेरित होता. व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हावा, या उद्देशाने हा प्रयोग करण्यात आला आणि तो प्रत्यक्षात व्हायरलही झाला.

मात्र, अशा प्रकारे वाहनाच्या बाह्य स्वरूपात बदल करणे वाहतूक नियमांचे उल्लंघन ठरू शकते, याची कल्पना नसल्याचे आदित्यने सांगितले. पोलिसांच्या कारवाईनंतर त्याने कारवरील सर्व लिपस्टिकच्या खुणा पुसल्या आणि दंड भरला. यापुढे कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेणार असल्याचेही त्याने सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; आतापर्यंत १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांना लाभ

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

VIP दर्शनावरून मंदिरात राडा; आमदाराच्या मुलीने महिला PSI च्या कानशिलात लगावली, प्रत्युत्तरात पोलिसानेही उगारला हात, Video

Pune : दोन महिला पोलिस करणार होत्या समलैंगिक विवाह; आळंदीत लग्नाची तयारी, पत्रिकाही छापल्या, पण आता विवाह रद्द

'वर्ककेशन'मध्ये मुंबईचा ग्लोबल डंका; 'वर्क फ्रॉम एनिवेअर'मुळे उत्पादकतेत ८० टक्के वाढ; कामासोबत पर्यटनासाठी मुंबईला जागतिक पसंती