मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये शुक्रवारी (दि. १२) दुपारी घडलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेले. रूप सिंग स्टेडियम रोडवर विवाहित पुरुषाने आपल्या पत्नीची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या केली. धक्कादायक म्हणजे, गोळीबार करत असताना तो फेसबुकवर लाईव्ह होता.
आरोपीचे नाव अरविंद परिहार असून हत्या झालेल्या महिलेचे नाव नंदिनी केवट असे आहे. शुक्रवारी दुपारी नंदिनी ही अंकुश पाठक या प्रियकरासोबत रस्त्याने जात असताना अरविंदने तिला थांबवलं. त्यानंतर देशी बनावटीच्या ३१५ बोरच्या पिस्तूलातून त्याने सलग पाच गोळ्या तिच्यावर झाडल्या. त्यापैकी चार गोळ्या नंदिनीच्या डोक्यात आणि छातीत घुसल्या. नंदिनी जागीच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. अरविंदच्या हातात पिस्तूल पाहून अंकुश पळाला. गोळीबार झाल्यानंतर अरविंद नंदिनीच्या मृतदेहाजवळ बसला आणि लोकांनी जवळ येऊ नये म्हणून बंदुकीचा धाक दाखवत होता.
फेसबुक लाईव्हमधून कबुलीजबाब
तिच्या सोबत असलेल्या प्रियकराने सांगितले, की नंदिनी आणि तो, अरविंद विरोधात तक्रार दाखल करून पोलिस स्टेशन बाहेर पडले होते. अरविंद नंदिनीला अश्लील व्हिडिओ पाठवून धमकावत असल्याचे अंकुशने सांगितले. हत्येच्या वेळी अरविंद फेसबुक लाईव्हवर होता. त्यात तो म्हणाला, “भावांनो, तिने माझ्याविरुद्ध खोटा खटला दाखल केला. अनेक मुलांसोबत हॉटेलमध्ये राहिली. माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगतो, ती खोटारडी आहे.” असे म्हणत त्याने नंदिनीवर हल्ला केला.
घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले. कोणीही अरविंदजवळ जायला धजावत नव्हते. पिस्तूल दाखवत तो वारंवार लोकांना आणि पोलिसांना दूर राहण्याची धमकी देत होता. पोलिसांनी कार्बाइनमधून गोळीबार करून त्याला काबूत आणण्याचा प्रयत्न केला, पण शस्त्र निकामी झाले. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. त्यावेळी अरविंद गोंधळून गेला आणि संधी साधून पोलिसांनी त्याला पकडले. त्याला बेदम मारहाण करून ताब्यात घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नंदिनीचा गुन्हेगारी भूतकाळ
या प्रकरणाने आणखी एक वळण घेतले आहे. तपासात नंदिनीच्या पाच प्रेमसंबंधांचा आणि गुन्हेगारी भूतकाळाचा उलगडा झाला. नंदिनीचे पहिले लग्न दहा वर्षांपूर्वी दतिया जिल्ह्यात गोटीराम केवट याच्यासोबत झाले होते. या विवाहातून तिला एक मुलगी असून ती सध्या झाशीमध्ये आजी-आजोबांसोबत राहते. लग्नानंतर नंदिनीचे तिच्या पतीचा मित्र छोटू केवट, निमलेश सेन आणि फिरोज खान यांच्यासोबत संबंध असल्याची माहिती समोर आली. २०१७ मध्ये नंदिनीने तिच्या चौथ्या प्रियकरासोबत मिळून तिसऱ्या प्रियकराची (निमलेश सेन) हत्या केली होती. या प्रकरणात ती चार वर्षे सहा महिने तुरुंगात राहिली आणि २०२२ मध्ये तीची सुटका झाली. सुटकेनंतर ती ग्वाल्हेरमध्ये आली आणि ब्युटी पार्लर सुरू केले. याच काळात तिची भेट कंत्राटदार अरविंद परिहारशी झाली. २०२३ मध्ये नंदिनी आणि अरविंदने मंदिरात लग्न केले. परंतु, लग्नानंतर लवकरच त्यांच्या नात्यात दुरावा आला. सतत भांडणं होऊ लागली आणि नंदिनीने अरविंदवर तीन गुन्हे दाखल केले.
अरविंदने नंदिनीवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. दहा महिन्यांपूर्वीही त्याने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या वेळी नंदिनी थोडक्यात बचावली होती.
कुटुंबियांचा मृतदेह घेण्यास नकार
नंदिनीच्या हत्येनंतर तिच्या वडिलांनी आणि सासरच्यांनी तिचा मृतदेह घेण्यास नकार दिला. अंकुश पाठक या तिच्या प्रियकराने मृतदेह घेण्याची तयारी दाखवली, मात्र पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाही.
रुप सिंग स्टेडियम रोडसारख्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या खूनप्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.