नवी दिल्ली : नीट पेपरफुटीवरून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी यशस्वी आंदोलन केल्यानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) आपला मोर्चा निवडणूक आयोगाकडे वळविला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांनी पुढील २४ तासांत आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही, तर २ ऑक्टोबरपासून देशभरात उग्र आंदोलन पुकारलेले जाईल आणि त्याची सुरुवात मुंबईतून केली जाईल, असा इशारा सीजेपी दिला आहे. निवडणूक आयोग मतदारांच्या हक्कांवर गदा आणत असल्याचा गंभीर आरोप या तरुण नेतृत्व असलेल्या पक्षाने केला आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी शुक्रवारी 'एक्स'वर माहिती देताना सांगितले की, "ज्ञानेश कुमार यांनी उद्यापर्यंत राजीनामा दिला नाही, तर सीजेपी २ ऑक्टोबरपासून मुंबईतून आपल्या देशव्यापी आंदोलनाची सुरुवात करेल आणि ते देशभरातील इतर शहरांमध्ये पसरवेल. तसेच "या गांधी जयंतीला लोकशाही वाचवण्याचा संकल्प करूया," असे आवाहनही त्यांनी केले.
'इलेक्शन कमिशन ठीक करो' मोहीम
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान देशभरातील ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे १३ कोटींहून अधिक मतदारांची नावे मसुदा मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप पक्षाने केला आहे. यासाठी पक्षाने 'इलेक्शन कमिशन ठीक करो' ही विशेष मोहीम सुरू केली आहे. पक्षानुसार, या प्रक्रियेत महाराष्ट्रातून २ कोटींहून अधिक, उत्तर प्रदेशातून २ कोटींहून अधिक, कर्नाटकातून १ कोटी, वाटाणाडूतून (तमिळनाडू) ९७ लाख, पश्चिम बंगालमधून ९० लाख, तेलंगणातून ७३ लाख, दिल्लीतून ४७ लाख आणि केरळमधून २४ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. लोकशाहीत जनता आपले सरकार निवडते, परंतु ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगच ठरवत आहे की कोणी मतदार यादीत राहायचे आणि कोणी नाही. ही लोकशाही नसून एकछत्री अंमल (हुकूमशाही) आहे, अशी टीका अभिजित दीपके यांनी केली.
मुंबई उच्च न्यायालयात याचिका
दरम्यान, महाराष्ट्राच्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाविरोधात (एसआयआर) मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांमध्ये एसआयआरची घटनात्मक वैधता, प्रक्रिया आणि अंमलबजावणी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, दोन निवडणूक आयुक्तांचा आक्षेप असूनही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एसआयआरशी संबंधित १४ आदेश जारी केले. त्यांनी हे आदेश रद्द करण्याची आणि दाखल केलेले आक्षेप जाहीर करण्याची मागणी केली आहे.
मॅनेज' केलेल्या निवडणुकांवर बहिष्कार टाका, दीपकेंचे विरोधी पक्षांना आवाहन
नवी दिल्ली : निवडणूक प्रक्रिया 'मॅनेज' किंवा हेरफेर केलेली आहे असा विश्वास असेल, तर निवडणुकांमध्ये भाग घेणे बंद करावे, असे आवाहन सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी विरोधी पक्षांना केले. विरोधकांच्या अशा सहभागामुळेच अशा निवडणुकांना वैधता मिळते आणि त्या मुक्त व निष्पक्ष असल्याचा "भास" निर्माण होतो, असे ते म्हणाले.
एक्सवरील एका पोस्टमध्ये दीपके म्हणाले की, विरोधी पक्ष एकाच वेळी निवडणुकांमध्ये हेरफेर होत असल्याचा दावा करणे आणि दुसरीकडे त्यात भाग घेणे या दोन्ही गोष्टी एकत्र करू शकत नाहीत. होय, निवडणुकांमध्ये हेरफेर होत आहे. पण जेव्हा तुम्ही अशा हेरफेर झालेल्या निवडणुकांमध्ये सहभागी होत राहता, तेव्हा तुम्ही या निवडणुकांना वैधता देता आणि त्या मुक्त आणि निष्पक्ष असल्याचे भासवायला मदत करता, असे दीपके यांनी नमूद केले.
निवडणुकांपासून दूर राहिल्यास आपले राजकीय अस्तित्वच संपेल या भीतीपोटी विरोधी पक्ष यात सहभागी होत आहेत का, असा सवाल सीजेपी संस्थापकांनी उपस्थित केला.जर तुम्ही निवडणूक लढवली नाही तर तुमचे अस्तित्व संपेल, या भीतीने कदाचित तुम्ही लढत राहता. पण जेव्हा मते चोरीला जात आहेत, तुमचे आमदार-खासदार फोडले जात आहेत आणि तुमचे पक्ष फोडले जात आहेत, तेव्हा तुम्ही कोणत्या अस्तित्वाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहात, असा प्रश्न त्यांनी विचारला.