नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी इतिहासासंदर्भात केलेल्या एका विधानावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. महमूद गझनी आणि लोधी हे बाहेरून आले नव्हे, ते भारतीयच लुटारू होते, असे अन्सारी एका व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत. त्यांच्या या विधानावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. तसेच, काँग्रेसची संपूर्ण व्यवस्थाच हिंदुविरोधी लोकांचे उदात्तीकरण करत असल्याचा आरोप केला आहे.
भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी अन्सारींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. हामिद अन्सारींचे विधान ही काही एकाकी घटना नाही, तर काँग्रेस कशा पद्धतीने हिंदुविरोधी लोकांचे महिमामंडन करते, याचे ताजे उदाहरण आहे. ज्या गझनीने सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त केले. ते अपवित्र केले, त्याचे गुणगान काँग्रेसची ही इकोसिस्टम करत आहे, असे पूनावाला यांनी म्हटले आह. एवढेच नाही तर, हे लोक औरंगजेब आणि हिंदूंवर अत्याचार करणाऱ्यांच्या गुन्ह्यांवर पांघरूण घालतात, असेही पुनावाला म्हणाले.
अन्सारी यांनी आपल्या मुलाखतीत अफगाणिस्तानपर्यंतचा प्रदेश त्या काळी भारताचाच भाग असल्याचे सांगत, असा तर्क मांडला की, जर तो भाग भारताचा होता, तर तिथून आलेले लोकही भारतीयच होते. २००७ मध्ये उपराष्ट्रपती होण्यापूर्वी अन्सारी काँग्रेसचे सदस्य होते. त्यांनी उल्लेख असलेला गझनी हा गझनी वंशाचा शासक होता, ज्याने भारतावर अनेक आक्रमणे करत लुटालूट केली होती. तर लोधी वंशाचा शेवटचा शासक इब्राहिम लोधी याचा १५२६ मध्ये झालेल्या पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबरने पराभव केला होता.