Himachal Tragedy : नियंत्रण सुटून प्रवासी बस थेट १०० फूट खाली कोसळली; भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, Video 
राष्ट्रीय

Himachal Tragedy : नियंत्रण सुटून प्रवासी बस थेट १०० फूट खाली कोसळली; भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, Video

चलुंज वळणाजवळ बस वळत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात शनिवारी (दि. ८) बैरागढहून चंब्याकडे जाणाऱ्या खासगी बसचा चलुंज मोडजवळ भीषण अपघात झाला. वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरून घसरून सुमारे १०० फूट खाली असलेल्या रस्त्यावर कोसळली. सकाळी सुमारे ७.१५ वाजता घडलेल्या या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू, तर ११ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बसचालक आणि वाहकाचाही समावेश असल्याची माहिती असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

चलुंज मोडजवळ झाला अपघात

बैरागढ-तिस्सा मार्गावरून बस चंब्याच्या दिशेने जात होती. बसने अवघे ३ किलोमीटर अंतर पार केले होते. चलुंज मोडजवळ वळण घेत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरून घसरून खाली असलेल्या दुसऱ्या रस्त्यावर कोसळली.

दुर्गम आणि धोकादायक डोंगरी मार्ग

चुराह खोऱ्यातील हा सुमारे २७ किलोमीटरचा डोंगरी मार्ग अरुंद रस्ते आणि खोल दऱ्यांसाठी ओळखला जातो. सच पासकडे जाण्यासाठीही हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या मार्गावर वाहन चालवताना मोठी खबरदारी घ्यावी लागते.

बसखाली अडकले प्रवासी

अपघातानंतर बस उलटल्याने अनेक प्रवासी वाहनाखाली अडकले. प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्याला वेग दिला.

बॅकहो लोडर्सच्या मदतीने बचावकार्य

बस उचलण्यासाठी बॅकहो लोडर्स ( JCBसारखे बांधकाम यंत्र) चा वापर करण्यात आला. बसखाली आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांनी प्रयत्न केले. जखमींना तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले.

बसचे बहुतांश प्रवासी स्थानिक

प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये १८ ते २० प्रवासी असल्याची शक्यता आहे. बसमधील बहुतांश प्रवासी स्थानिक असून ते चंबा शहराकडे जात होते. मात्र, अपघाताच्या वेळी बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज

प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, चलुंज वळणाजवळ बस वळत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

एसपींकडून तपासाची माहिती

चंबाचे पोलीस अधीक्षक विजय सकलानी यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदारांकडून दुःख व्यक्त

या दुर्घटनेबद्दल चुराहचे आमदार हंस राज यांनी दुःख व्यक्त केले. चलुंजजवळ झालेला अपघात अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगत त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. तसेच जखमी प्रवासी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांनी केली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वेलंकणी यात्रेसाठी पश्चिम रेल्वेकडून चार विशेष गाड्या; १० ऑगस्टपासून आरक्षण सुरू

Mumbai : १६ पैकी १२ रहिवाशांनी स्वेच्छेने जागा केली रिकामी; धारावीतील कारवाईबाबत डीआरपीचे स्पष्टीकरण

‘तिसऱ्या मुंबई’च्या विकासाला मिळणार वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

जव्हारमध्ये मोठे भूस्खलन; सततच्या घटनांमध्ये वाढ, लोकवस्ती नसल्याने अनर्थ टळला

KEM मधील ‘वन स्टॉप सेंटर’ पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू; समुपदेशक, वकिलांसह १० कर्मचाऱ्यांची नियुक्ती