Cyber Scam : व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा

व्हॉट्सॲपवर पैसे कापल्याचा मेसेज आल्यानंतर 'NO' रिप्लाय करताय? नव्या सायबर स्कॅमबाबत हैदराबाद पोलिसांनी इशारा दिला आहे. फसवणूक कशी होते आणि बचावासाठी काय करावं, जाणून घ्या...
व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा
व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा
Published on: 

सायबर गुन्हेगार कधी बनावट लिंक पाठवून, तर कधी बँकेतून बोलत असल्याचं सांगून लोकांची फसवणूक करतात. अनेकदा खात्यातून पैसे कापल्याचा खोटा मेसेज पाठवूनही नागरिकांना घाबरवलं जातं. अशा फसवणुकीच्या घटना आपण नेहमीच ऐकतो. मात्र, आता व्हॉट्सॲपवरून फसवणूक करण्याची आणखी एक नवी पद्धत चर्चेत आली आहे. अनोळखी नंबरवरून आलेल्या बँक व्यवहाराच्या मेसेजला केवळ 'NO' असं उत्तर दिल्यानेही आर्थिक नुकसान होऊ शकतं, असा इशारा हैदराबादचे पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनर यांनी दिला आहे. त्यामुळे नेमका हा स्कॅम काय आहे आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा, जाणून घेऊया.

नेमका काय आहे नवा व्हॉट्सॲप स्कॅम?

तुमच्या मोबाईलवर अचानक एक व्हॉट्सॲप मेसेज येतो. त्यात तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले गेल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर लगेच दुसरा मेसेज येतो. त्यात, 'हा व्यवहार तुम्ही केला नसेल, तर तातडीने NO असं उत्तर द्या', असं लिहिलेलं असतं.

खात्यातून पैसे गेल्याचं वाचून अनेकजण घाबरतात आणि कोणतीही खात्री न करता उत्तर देतात. याच भीतीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

'NO' म्हटल्यावर खात्यातील पैसे जातात?

हैदराबादचे पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनर यांनी एक्सवर या फसवणुकीबाबत माहिती देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, सायबर गुन्हेगार 'ऑटो-एक्झिक्युशन फाइल अटॅक' नावाच्या तंत्राचा वापर करत आहेत.

अशा प्रकारात एका चार्टर्ड अकाउंटंटचीही फसवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं. संबंधित व्यक्तीने कोणालाही ओटीपी दिला नव्हता किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक केलं नव्हतं, तरीही त्याच्या खात्यातील पैसे गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

मात्र, केवळ व्हॉट्सॲपवर 'NO' असं साधं उत्तर दिल्याने मोबाईलमध्ये मालवेअर आपोआप सुरू होतं किंवा बँक खातं रिकामं होतं, याला स्वतंत्र तांत्रिक पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे अशा दाव्यांमुळे घाबरण्याऐवजी संशयास्पद मेसेजपासून सावध राहणं महत्त्वाचं आहे.

फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

  • अनोळखी नंबरवरून बँक व्यवहारासंबंधी मेसेज आल्यास 'YES' किंवा 'NO' असं उत्तर देऊ नका.

  • मेसेजमधील लिंक, फाइल किंवा ॲप डाउनलोड करण्याच्या सूचनेवर विश्वास ठेवू नका.

  • पैसे कापले गेले आहेत का, हे बँकेच्या अधिकृत ॲपमधून तपासा.

  • संशयास्पद नंबर ब्लॉक करा आणि मेसेजची तक्रार नोंदवा.

  • ओटीपी, यूपीआय पिन किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका.

व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा
सायबर भामट्यांनी खाते रिकामे केले? घाबरू नका; पैसे परत मिळवण्यासाठी अशी करा तक्रार
व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा
Mumbai : 'मीटर रीडिंग अपडेट करा' म्हणत पाठवली फेक APK फाईल; ६.२५ लाखांचा गंडा, अशा फ्रॉडपासून तुम्ही कसे वाचाल?

फसवणूक झाल्यास कुठे तक्रार कराल?

सायबर फसवणुकीत पैसे गमावल्यास वेळ न दवडता १९३० या सायबर गुन्हे हेल्पलाइनवर संपर्क साधा. तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टल येथे ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. पोलिसांनी नागरिकांना घाईत कोणताही प्रतिसाद न देता आधी व्यवहाराची खात्री करण्याचं आवाहन केलं आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in