हिमाचलमध्ये १५० मीटर खोल दरीत कोसळली इनोव्हा क्रिस्टा; गुजरातमधील पाच पर्यटकांसह चालकाचा मृत्यू, ४ जण गंभीर जखमी X
राष्ट्रीय

हिमाचलमध्ये १५० मीटर खोल दरीत कोसळली इनोव्हा क्रिस्टा; गुजरातमधील पाच पर्यटकांसह चालकाचा मृत्यू, ४ जण गंभीर जखमी

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात इनोव्हा क्रिस्टा १५० मीटर खोल दरीत कोसळल्याने गुजरातमधील पाच पर्यटकांसह सहा जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

Mayuri Gawade

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. मनालीहून डलहौसीकडे जात असलेली इनोव्हा क्रिस्टा कार रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळल्याने गुजरातमधील पाच पर्यटकांसह चालकाचा मृत्यू झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

ही दुर्घटना चंबा जिल्ह्यातील ककीरा परिसरात पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे वाहनाचा ताबा सुटल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

मृतांमध्ये गुजरातमधील भावनगर येथील सिंधी कॉलनी परिसरात राहणारे लालितभाई फटनानी, ममताबेन फटनानी, प्रियंक कनैयालाल भोपानी, काजल भोपानी आणि त्यांचा मुलगा दिव्यांश भोपानी यांचा समावेश आहे. वाहन चालक जसवंत कुमार हा हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्याचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते.

१५० मीटर खोल दरीत कोसळली कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा क्रिस्टा कार अरुंद आणि एकेरी रस्त्यावरून जात असताना घसरली आणि सुमारे १५० मीटर खोल दरीत कोसळली. अपघातावेळी परिसरात जोरदार पाऊस सुरू होता.

या अपघातात मयंक ललितभाई फटनानी, फोरेमबेन मयंक फटनानी तसेच जियांश फटनानी आणि प्रियांशी भोपानी ही दोन लहान मुलं जखमी झाली आहेत. गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी कांगडा येथील डॉ. राजेंद्र प्रसाद सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हवामान खात्याचा आधीच इशारा

चंबाचे पोलीस अधीक्षक विजय कुमार सकलानी यांनी सांगितलं की, वाहनात चालकासह एकूण १० जण प्रवास करत होते. यापैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, हवामान खात्याने यापूर्वीच या भागासाठी खराब हवामानाचा इशारा दिला होता. चंबाचे जिल्हाधिकारी मुकेश रेपासवाल यांनी पर्यटकांना हवामानाचा इशारा असताना प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

UPI व्यवहारांवरील MDR शुल्काला तूर्तास ब्रेक! सणासुदीत NPCI चा मोठा निर्णय, आता कधीपासून मोजावे लागणार पैसे?

Nalasopara : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचाही आरोप

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Cyber Scam : व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा