राष्ट्रीय

हीच खरी श्रीमंती! स्वतः बेघर, तरीही थंडीत कुडकुडणाऱ्यांना ब्लँकेटचे वाटप, पठाणकोटच्या राजूची सोशल मीडियावर चर्चा

भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या राजूने थंडीने त्रस्त असलेल्या बेघर लोकांकडे लक्ष दिले. स्वतःकडे कायमस्वरूपी घर आणि पुरेसे सामान नसतानाही त्याने...

किशोरी घायवट-उबाळे

उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीने जोर धरल्याने रस्त्यावर राहणाऱ्या बेघरांसाठी रात्री बाहेर राहणं अधिकच धोकादायक ठरत आहे. तापमानात मोठी घट झाल्याने अनेकांकडे अंगावर पांघरायला चादरही नसल्याची विदारक स्थिती आहे. अशा परिस्थितीत पंजाबच्या पठाणकोट येथील एक हृदयस्पर्शी घटना सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

माहितीनुसार, भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या राजूने थंडीने त्रस्त असलेल्या बेघर लोकांकडे लक्ष दिले. स्वतःकडे कायमस्वरूपी घर आणि पुरेसे सामान नसतानाही त्याने गरजूंसाठी पुढाकार घेतला. ऐन थंडीत रस्त्यावर झोपणाऱ्या बेघरांसाठी त्याने ब्लँकेट वाटपाचा उपक्रम सुरू केला. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी राजूकडे पैसे नव्हते. त्याने घराघरांत जाऊन लोकांना मदतीची विनंती केली. अनेक नागरिकांनी केवळ १० रुपयांची छोटीशी मदत केली. अशा छोट्या योगदानातून राजूने ५०० ब्लँकेट्स जमा केले आणि ते थंडीने कुडकुडणाऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवले. राजूच्या या कार्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

उबेबरोबरच आशेचा आधार

"या ब्लँकेटमुळे गरजूंना केवळ थंडीपासून संरक्षण मिळाले नाही, तर आपलीही कोणीतरी काळजी घेत आहे, ही भावना निर्माण झाली. रस्त्यावर थरथरत काढलेल्या रात्री काहीशा सहनशील झाल्या," असे अनेकांनी सांगितले.

“देव सगळं घडवत असतो, मी फक्त माझं काम करत राहतो. गरजू व्यक्ती समोर आली की मदत करणं हीच माझी जबाबदारी आहे." असे राजूने सांगितले.

पंतप्रधानांकडून राजूचे कौतुक

मिळालेल्या माहितीनुसार, राजूने हे सामाजिक कार्य पहिल्यांदाच केले नाही. कोविड-१९ महामारीच्या काळातही त्याने अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत केली होती. त्या कार्याची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात घेतली होती. पंतप्रधानांनी राजूचे कौतुक केले होते.

राजू आजही बेघरच

इतरांना मदत करत असतानाही राजू आजही बेघरच आहे. आपल्याला कायमस्वरूपी घर मिळावे, अशी विनंती त्याने सरकारकडे केली आहे. त्याची परिस्थिती पाहून स्थानिक नागरिकांनी त्याच्या माणुसकीचे कौतुक केले असून, समाजाने त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले आहे.

माणुसकीसाठी संपत्ती आवश्यक नाही

पठाणकोटमधील नागरिकांचे म्हणणे आहे की, राजूची गोष्ट ही एक महत्त्वाची शिकवण देते. माणुसकीसाठी संपत्ती किंवा सामाजिक दर्जा आवश्यक नसतो. कडाक्याच्या थंडीतही मानवतेचा प्रकाश कसा उजळतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

१५ जानेवारीला मतदानासाठी सुट्टी, सवलत नाही? 'या' क्रमांकावर साधा संपर्क

Navi Mumbai Election : "... अन्यथा नाईकांचा 'टांगा' कुठे फरार होईल कळणार नाही", शंभूराज देसाई यांचा इशारा

'लाडकी बहीण'चे पैसे निवडणुकीनंतरच द्या! काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

'बॉर्डर २'मधील वरुण धवनच्या अभिनयावर टीका करण्यासाठी ₹५ लाखांची ऑफर; इन्फ्लुएन्सरचा दावा, कॉल रेकॉर्डिंगही केली शेअर

विवाहित प्राध्यापकासोबत संबंध; घरगुती हिंसाचार प्रकरणात महिलेची याचिका बॉम्बे हायकोर्टाने फेटाळली