राष्ट्रीय

संजीव जैयस्वाल यांची ‘ईडी’ चौकशीला दांडी

मला आणखी वेळ हवा असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी त्यांना गुरुवारी चौकशीला बोलवले होते. त्यांनी त्यावेळी चार दिवसांची वेळ मागून घेतली होती

धर्मेश ठक्कर

कोविड जम्बो घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ सनदी अधिकारी संजीव जैयस्वाल यांनी ‘ईडी’च्या चौकशीला सलग दुसऱ्यांदा दांडी मारली आहे. जैयस्वाल यांना सोमवारी चौकशीला ‘ईडी’ बोलवले होते, मात्र मला आणखी वेळ हवा असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी त्यांना गुरुवारी चौकशीला बोलवले होते. त्यांनी त्यावेळी चार दिवसांची वेळ मागून घेतली होती.

१९९६ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असलेल्या जैयस्वाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण विशेष तपास पथकानेही कोविड घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. तसेच ‘ईडी’नेही चौकशीची व्याप्ती वाढवली आहे.

सूत्रांनी सांगितले की, जैयस्वाल यांच्या निवासस्थानातून जप्त केलेल्या कागदपत्रांची छाननी केली आहे. ठाणे येथील बिल्डर आणि क्रेडाईच्या पदाधिकाऱ्याच्या सदस्यामार्फत अनेक बेनामी मालमत्ता आणि परदेशात केलेल्या गुंतवणुकीचा तपास सुरू आहे. जैयस्वाल हे ठाणे मनपाचे आयुक्त असताना त्यांनी बिल्डर्सच्या बाजूने अनेक निर्णय घेतले होते. त्यांनी परदेशात अनेक बांधकामांमध्ये गुंतवणूक केल्याचे कागदपत्रातून दिसून आले.

ठाणे मनपाच्या नगररचना विभागातील काही अधिकाऱ्यांना व ठाण्यातील नामवंत आर्किटेक्ट व विकासकांची ओळख पटली असून, त्यांना लवकरच चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे, असे ‘ईडी’च्या तपास अधिकाऱ्याने सांगितले.

परदेशात गुंतवणूक नाही -जैयस्वाल

कोणतीही अनियमितता घडलेली नाही तसेच परदेशात गुंतवणूक असल्याचे आरोप जैयस्वाल यांनी फेटाळून लावले आहे. ठाणे मनपात माझ्या कारकीर्दीत कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. प्रत्येक मान्यताही कायदा व तरतुदीनुसार झालेली आहे. त्यात कोणाच्याही बाजूने काम करण्याचा प्रश्नच नाही, असा खुलासा जैयस्वाल यांनी केला.

गेल्या आठवड्यापासून ईडीने मुंबई व ठाण्यातील १५ ठिकाणी छापेमारी केली आहे. संजीव जैयस्वाल यांच्या वांद्रे येथील घरातही छापेमारी करण्यात आली. त्यांनी मुंबई मनपात अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले आहे. आता ते म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांच्याकडून अनेक मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली असून, त्याची किंमत १०० कोटी रुपये असल्याचे समजते. १५ कोटींच्या मुदत ठेवीच्या पावत्या व ज्वेलरी सापडली आहे. या मालमत्तेची किंमत ३४ कोटी रुपये आहे. ती मालमत्ता माझ्या पत्नीला तिच्या वडिलांनी ‘गिफ्ट’ म्हणून मिळाली आहे. ते माजी मुख्य प्राप्तिकर आयुक्त होते.

जम्बो कोविड सेंटरला लागणारी यंत्रणा, बेड‌्स‌, पीपीई किट‌्स‌, ग्लोव्ह‌्ज, कँटीन, मेडिकल कर्मचारी आदी बाबी महागड्या दराने घेतल्या गेल्या. त्याला जैयस्वाल यांनी मान्यता दिली. त्यामुळे त्यांची चौकशी होणार आहे.

जैयस्वाल यांनी सांगितले की, राजकीय वादातून हा प्रकार घडत आहे. कोविड काळात मुंबईतील मनपातील केंद्रीय खरेदी विभागातील खरेदीही माझ्या अखत्यारित झालेली नाही. कोविड खरेदीतील कोणत्याही फाइलवर माझी एकही सही नाही. सर्व खरेदी केंद्रीय खरेदी विभागाचे प्रमुख बिरादार, अतिरिक्त आयुक्त वेलरासू व आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केली आहे.

कोविड काळात खुल्या बाजारातील दरांपेक्षा औषधांची खरेदी २५ ते ३० टक्के दरांनी करण्यात आली. मृतदेह ठेवायला लागणाऱ्या बॅगा या मनपाच्या केंद्रीय खरेदी विभागाने ६८०० रुपये (प्रति बॅग) खरेदी केल्या. याच बॅगा अन्य रुग्णालयांना २ हजार रुपयांनी मिळाल्या, असे ‘ईडी’ला तपासात आढळले.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश