राष्ट्रीय

विनेश फोगटप्रकरणी विरोधकांचा सभात्याग, उपसभापती धनखडही खुर्ची सोडून गेले

महिला कुस्तीवीर विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्याचे तीव्र पडसाद गुरुवारीही राज्यसभेत उमटले.

Swapnil S

नवी दिल्ली : महिला कुस्तीवीर विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्याचे तीव्र पडसाद गुरुवारीही राज्यसभेत उमटले. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी व काही विरोधी पक्षाच्या खासदारांनी विनेश फोगटच्या अपात्रतेचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, पण राज्यसभेच्या सभापतींनी तो उपस्थित करू दिला नाही. त्यामुळे नाराज विरोधक संतप्त होऊन घोषणाबाजी करू लागले. यामुळे राज्यसभेचे उपसभापती जगदीप धनखड हे नाराज होऊन खुर्चीवरून उठून निघून गेले.

धनखड म्हणाले की, सभागृहात जे काही घडले ते योग्य नाही. मला नाही तर सभापतीच्या पदाला आव्हान दिले जात आहे. विरोधी पक्ष माझ्याविरोधात वक्तव्य करत आहेत. माझा अपमान केला जात असल्याने मी स्वत:ला सक्षम समजू शकत नाही.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे हे विनेश फोगटचा मुद्दा सभागृहात मांडू इच्छित होते. त्याला सभापतींनी परवानगी नाकारल्याने विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. त्यामुळे सभापती धनखड नाराज झाले. अखेर धनखड यांनी विरोधी पक्षनेते खर्गे यांना बोलण्यास परवानगी देऊन विचारले की, तुम्हाला काय बोलायचे आहे. तेव्हा खर्गे म्हणाले की, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हे प्रकरण केवळ विनेशशी संबंधित नाही. या प्रकरणाच्या पाठी कोण आहे यावर आम्हाला चर्चा करायची आहे. यानंतर विरोधकांनी जोरदार गदारोळ झाला.

याचवेळी सभापती धनखड व तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांच्यात वाद झाला. त्यावर धनखड यांनी ओब्रायन यांना सांगितले की, तुम्ही खुर्चीवर बसून ओरडत आहात. तुमच्या वर्तनाचा मी निषेध करतो. पुढे असे घडल्यास तुम्हाला बाहेर काढले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. अखेर गदारोळ वाढल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

धनखड म्हणाले की, केवळ तेच हुशार आहेत, असे विरोधकांना वाटते. केवळ त्यांनाच दु:ख झाले आहे, असा त्यांचा समज आहे. पण, विनेशच्या बाबतीत जे घडले त्यामुळे संपूर्ण देश दु:खात आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून सगळ्यांनाच वेदना होत आहेत. या मुद्द्याचे राजकारण करणे हे विनेशच्या आत्मसन्मानावर आघात करण्यासारखे आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यसभेतील भाजपचे गटनेते जे. पी. नड्डा यांनीही विरोधकांच्या वागणुकीचा निषेध केला. विनेशच्या अपात्रेवरून काँग्रेस राजकारण करत असून त्यांच्याकडे चर्चा करायला मुद्दाच नसल्याची टीका त्यांनी केली.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या