(Photo-X)
राष्ट्रीय

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

तरुणांची ऊर्जा आणि कौशल्याची जोड या क्षेत्रांना मिळाल्यास पुढील पाच ते सात वर्षांत मागील अनेक दशकांत जे साध्य झाले नाही, ते साध्य करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. १५) दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी विकसित भारताचे लक्ष्य, आत्मनिर्भरता, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि महिला सक्षमीकरणासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यंदाच्या सोहळ्यात प्रथमच लाल किल्ल्यावर 'वंदे मातरम्' चे सादरीकरण झाले.

'सप्तधारा'तून भारताच्या विकासाला गती

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी 'सप्तधारा' म्हणजेच सात शक्तिप्रवाहांचे व्हिजन मांडले. कृषी आणि अन्नप्रक्रिया, तंत्रज्ञान व नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण, हरित व निळी अर्थव्यवस्था आणि भारताची सॉफ्ट पॉवर या क्षेत्रांवर त्यांनी विशेष भर दिला. तरुणांची ऊर्जा आणि कौशल्याची जोड या क्षेत्रांना मिळाल्यास पुढील पाच ते सात वर्षांत मागील अनेक दशकांत जे साध्य झाले नाही, ते साध्य करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य

भारताला स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षापर्यंत म्हणजेच २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य पंतप्रधानांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी देशातील १४० कोटी नागरिकांचे सामूहिक प्रयत्न, मेहनत आणि सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सेमीकंडक्टर क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

भारताने सेमीकंडक्टर क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वाची प्रगती केल्याचे मोदी यांनी सांगितले. देशात सध्या तीन मोठे सेमीकंडक्टर प्लांट कार्यरत असून, येथील उत्पादनाची निर्यातही सुरू झाली आहे. पुढील सात ते आठ वर्षांत आणखी पाच ते आठ सेमीकंडक्टर प्लांट सुरू होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

या दशकात पाच नवे अणुभट्टी प्रकल्प

ऊर्जा सुरक्षा ही काळाची गरज असल्याचे सांगत मोदी यांनी अणुऊर्जेवरही भर दिला. २०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, या दशकात पाच नवीन अणुभट्ट्या सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला आरक्षणाला सर्वपक्षीय पाठिंबा देण्याचे आवाहन

महिलांना ३३ टक्के आरक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. या निर्णयाला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा आणि त्याचे श्रेयही घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

पूर आणि भूस्खलनग्रस्त कुटुंबांना मदतीचा विश्वास

देशातील काही भागांना नुकताच पूर आणि भूस्खलनाचा फटका बसला. अनेक कुटुंबांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संकटग्रस्त कुटुंबांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी असून, सरकार आणि संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मोदी यांनी दिली.

विविध क्षेत्रांतील ५ हजार विशेष पाहुणे

यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विविध क्षेत्रांतील सुमारे ५ हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये सरकारी योजनांचे लाभार्थी, महिला उद्योजक, स्वयंसेवक, शेतकरी, कारागीर, स्वच्छता कर्मचारी, विद्यार्थी, शास्त्रज्ञ, स्टार्टअप संस्थापक आणि इंटर्न यांचा समावेश होता. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील १,५०० हून अधिक नागरिक पारंपरिक वेशभूषेत सोहळ्यासाठी उपस्थित होते.

लाल किल्ल्यावर प्रथमच 'वंदे मातरम्’चा निनाद

यंदाच्या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्यानंतर प्रथमच १५ ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरील मुख्य कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’चे सादरीकरण झाले. मोदींच्या भाषणानंतरही ‘वंदे मातरम्’चे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा ऐतिहासिक ठरला.

मोदींच्या खास पगडीचीही चर्चा

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी यांनी आकर्षक लाल बांधणीची पगडी परिधान केली होती. या पगडीवर लाल, हिरव्या आणि पांढऱ्या रंगांची नक्षी होती. तिच्या रचनेत राजस्थान आणि गुजरातमधील पारंपरिक शैलीची झलक दिसून आली.

'वंदे मातरम्'च्या जयघोषाने सोहळा रंगला

एकीकडे 'सप्तधारा'च्या माध्यमातून विकासाच्या नव्या दिशांचा संकल्प, तर दुसरीकडे आत्मनिर्भरता, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि महिला सक्षमीकरणावर भर देत पंतप्रधान मोदी यांनी ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून विकसित भारताचा रोडमॅप मांडला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

मल्ल्याचे ८७५१ कोटी कर्ज फेडणे बाकी; SBI चे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण

MPSC आंदोलनात फूट? पुण्यात तीन ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने, विद्यार्थ्यांमध्येही मतभेद

डेव्हिड हेडलीची साक्ष भारतासाठी ठरली 'मास्टरस्ट्रोक'; उज्ज्वल निकम यांचा गौप्यस्फोट