समन्वय वाढवण्यास दर दोन महिन्यांनी बैठक; इंडिया आघाडीचा निर्णय (Photo-X/@INCIndia)
राष्ट्रीय

समन्वय वाढवण्यास दर दोन महिन्यांनी बैठक; इंडिया आघाडीचा निर्णय

इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्षांची बैठक कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे सोमवारी पार पडली.

Swapnil S

नवी दिल्ली : इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्षांची बैठक कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे सोमवारी पार पडली. आपसात समन्वय वाढवण्यासाठी दर दोन महिन्यांनी बैठका घेतल्या जाव्यात असे या बैठकीत ठरले. मतदारयाद्यांच्या सखोल तपासणीबाबत सरन्यायाधीशांना पत्र लिहिण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. निवडणुकीतील व्होट चोरीबाबतही त्यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. देशाची गंभीर आर्थिक स्थिती, बेरोजगारी, महागाई वाढत आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे मुद्दे आणि अन्य महत्त्वाच्या विषयांबाबत सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे.

द्रमुक आणि आम आदमी या दोन प्रमुख पक्षांनी बैठकीकडे पाठ फिरवली. 'टीव्हीके' पक्षही या बैठकीला उपस्थित नव्हता. ज्या पक्षांचे संसदेत खासदार आहेत आणि जे मूळ 'इंडिया' आघाडीचा भाग होते, त्यांनाच या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले होते, असे इंडिया आघाडीच्या वतीने सांगण्यात आले.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांच्यासह अनेक डाव्या पक्षांचे नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, सीपीआय(एम) चे जॉन ब्रिटास, सीपीआयचे डी. राजा आणि इतर छोट्या पक्षांचे नेतेही या चर्चेत सहभागी झाले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आभासी पद्धतीने उपस्थित राहिले. तर अपक्ष खासदार कपिल सिब्बल यांनीही या बैठकीला हजेरी लावली होती.

१७ एप्रिल २०२६ रोजी लोकसभेत परिसीमनाच्या विधेयाच्या विरोधात आपण अभूतपूर्व एकजूट दाखवून दिली होती. आता आपल्याला तीच एकजूट आणखी मजबूत करावी लागेल, असे खर्गे यांनी यावेळी नमूद केले. तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, आम्ही सर्व मित्रपक्ष मिळून सामूहिकपणे निर्णय घेऊ. देशाला 'बंधू राष्ट्र' बनवण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न असतील आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे.

द्रमुकला परत आणू- पवार

पुणे : तमिळनाडूमध्ये काँग्रेसने थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिल्याने द्रमुक नाराज असून त्यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, द्रमुक बाहेर पडत असल्याचे दिसत असले, तरी आम्ही पुन्हा ८-१० दिवसांत प्रमुख नेत्यांची बैठक बोलावून मार्ग काढू. तूर्तास कोणीही टोकाचा निर्णय घेऊ नये, असे सूत्र ठरवण्यात आले आहे.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार