नवी दिल्ली : इराण संघर्ष आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे जगातील तिसरा सर्वात मोठा तेल वापरणारा देश असलेल्या भारताने पुरवठ्यात विविधता आणण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने लॅटिन अमेरिकेतून कच्च्या तेलाची आयात वाढवली आहे, असे जहाजांच्या ट्रॅकिंग डेटावरून दिसून येते.
‘क्लपर’च्या ट्रॅकिंग डेटानुसार, ऑगस्ट महिन्यात व्हेनेझुएलामधून भारताची कच्च्या तेलाची आयात लक्षणीयरीत्या वाढली असून, हा दक्षिण अमेरिकन देश आता भारताचा चौथा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला आहे. व्हेनेझुएलाकडून होणारा पुरवठा दररोज ४,४४,००० बॅरल्सवर पोहोचला आहे. तो इराकला (१,१८,००० बॅरल्स प्रति दिन) आणि अमेरिकेला (१,५३,००० बॅरल्स प्रति दिन) मागे टाकतो.
एप्रिलमध्ये आयात पुन्हा सुरू झाल्यापासून भारताच्या पुरवठ्यात व्हेनेझुएलाचे स्थान वेगाने वर आले आहे. मध्य पूर्वेतील पुरवठ्यात अडथळे आल्यानंतर भारतीय रिफायनरीजनी (तेल शुद्धीकरण कारखाने) रशियन तेलावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणे सुरूच ठेवले. तसेच व्हेनेझुएला, ब्राझील आणि आफ्रिकन कच्च्या तेलाची खरेदी वाढवली.
रशिया हा अजूनही प्रमुख पुरवठादार असून, ऑगस्टमध्ये तेथून झालेली आयात दररोज जवळपास २० लाख बॅरल्सच्या जवळ आहे. जून-जुलैमध्ये रशियन तेलाची आयात २६ लाख बॅरल्स प्रति दिन पोहोचली होती. ती भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या वापराच्या निम्म्याहून अधिक होती. यामुळे मध्यपूर्वेतील पारंपरिक पुरवठा मार्गांवरील अडथळ्यांपासून भारताचे रक्षण झाले. कच्चे तेल हा असा कच्चा माल आहे ज्याच्यापासून रिफायनरीज पेट्रोल आणि डिझेलसारखी इंधने तयार करतात.
भारताची कच्चे तेल आयात (ऑगस्ट २०२६)
पुरवठादार देश दैनंदिन आयात
रशिया २०,००,००० बॅरल (जवळपास ५०% वाटा)
व्हेनेझुएला ४,४४,००० बॅरल
अमेरिका १,५३,००० बॅरल
इराक १,१८,००० बॅरल
पुरवठादारांचे वैविध्यीकरण केल्याने पुरवठा सुरक्षित राहण्यास मदत होते, परंतु भू-राजकीय तणावापासून भारत पूर्णपणे अलिप्त राहू शकत नाही. जास्त अंतरावरून तेल आणल्यामुळे वाहतूक आणि विम्याचा खर्च वाढतो, ज्याचा थेट परिणाम भारताच्या आयात बिलावर होतो.सुमित रितोलिया, वरिष्ठ व्यवस्थापक, क्लपर