भारतभरातील अनेक नागरिकांच्या मोबाईलवर शनिवारी (दि.२) अचानक मोबाईलवर मोठा 'बीप' आवाज आणि व्हायब्रेशनसह अलर्ट वाजला असेल, तर घाबरण्याचं कारण नाही. हा कोणताही खरा धोका नसून, आपत्तीच्या वेळी नागरिकांना तात्काळ सूचना पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून देशभरात विशेष चाचणी घेतली जात आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) आणि दूरसंचार विभाग (DoT) यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम’ची चाचणी सुरू करण्यात आली आहे. भविष्यात भूकंप, पूर, चक्रीवादळ किंवा इतर मोठ्या संकटाच्या वेळी नागरिकांना त्वरित सूचना देण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
देशभरात अलर्ट सिस्टमची चाचणी
ही चाचणी दिल्ली-एनसीआरसह विविध राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये राबवली जात आहे. काही सीमावर्ती भाग किंवा निवडणुका असलेल्या प्रदेशांमध्ये ही प्रक्रिया मर्यादित असू शकते.
नेमकी काय आहे ही अलर्ट प्रणाली?
ही प्रणाली ‘SACHET’ प्लॅटफॉर्मचा भाग असून, विशिष्ट परिसरातील मोबाईल वापरकर्त्यांना थेट इमर्जन्सी सूचना पाठवते.
सामान्य SMS पेक्षा ही प्रणाली वेगळी आहे कारण:
इंटरनेटची गरज नसते
एकाच वेळी हजारो किंवा लाखो मोबाईलवर संदेश पोहोचतो
फोन सायलेंट किंवा Do Not Disturb मोडमध्ये असला तरी अलर्ट येतो
मोठा 'बीप' आवाज आणि व्हायब्रेशनसह सूचना मिळते
मोबाईलवर मोठा अलर्ट का ऐकू येतो?
चाचणीदरम्यान मोबाईलवर मोठ्या आवाजात अलर्ट येऊ शकतो. हा आवाज जाणीवपूर्वक ठेवण्यात आला आहे, जेणेकरून खऱ्या आपत्तीच्या वेळी नागरिकांचं त्वरित लक्ष जाईल.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की:
कोणतीही वास्तविक आपत्ती नाही
नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही
ही केवळ पूर्वनियोजित चाचणी आहे
भारताला ही प्रणाली का आवश्यक?
भारतामध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा धोका वारंवार निर्माण होतो. अशा परिस्थितीत वेगवान आणि अचूक सूचना पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
ही प्रणाली पुढील परिस्थितीत उपयुक्त ठरू शकते:
भूकंप
पूर आणि चक्रीवादळ
त्सुनामी
औद्योगिक अपघात
मोठ्या प्रमाणातील आपत्कालीन परिस्थिती
चाचणीत नेमकं काय तपासलं जातंय?
आजच्या चाचणीद्वारे प्रशासन विविध बाबींची पडताळणी करत आहे.
अलर्ट पोहोचण्याचा वेग
विविध टेलिकॉम नेटवर्कवरील कार्यक्षमता
वेगवेगळ्या मोबाईल उपकरणांशी सुसंगतता
इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधील संदेश वितरण
आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्त्वाचं पाऊल
अमेरिका, जपान आणि युरोपमधील देशांप्रमाणेच भारतातही अशी प्रणाली विकसित केली जात आहे. संकटाच्या वेळी वेळेत सूचना मिळाल्यास जीवितहानी कमी करण्यास मदत होऊ शकते.
आज मोबाईलवर आलेला अलर्ट हा केवळ सरावाचा भाग आहे. भविष्यात खऱ्या संकटाच्या वेळी लोकांपर्यंत तातडीने माहिती पोहोचावी, यासाठी ही तयारी केली जात आहे.